सुसरी वळण रस्ता ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:22 PM2020-12-06T12:22:10+5:302020-12-06T12:22:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ट्रॉली उलटून अपघात झाल्यानी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघात वाढले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता होईल तेव्हा होईल निदान या मार्गावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कोळदा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे सुरू असलेले काम संथगतीने होत असल्याने सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या तीन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यातच शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास याच मार्गावर कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी ठेकेदार व लोकप्रतिनिधींविरूध्द संताप व्यक्त केला. रस्ता रुंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुरू आहेत. या मार्गावर जाताना अनेकांना अपघाताशी सामना करावा लागत आहे. शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीत कापूस भरुन खेतिया येथे विक्रीसाठी जात असताना सुसरी धरण वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर व ट्रॉलीचे चाक खड्ड्यात आल्याने तोल अचानक बाजूला पडल्याने ते उलटून अपघात झाला.
किमान खड्डे तरी बुजवा...
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काही रस्तादेखील तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास विभाग नाशिक यांच्याकडे हा रस्ता हस्तांतर केला त्या वर्षापासून काम सुरू केले. परंतु काही भागात रस्त्याची पूर्णतः ‘वाट’ लागली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता होईल तेव्हा होईल मात्र तोपर्यंत निदान रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
शेतमाल व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ
सध्या शेतकरी कापूस विक्रीसाठी आपआपल्या वाहनात कापूस भरुन खेतिया येथे आणत आहेत. तसेच सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने जीव मुठीत घेऊन तेवढा रस्ता पार करावा लागत आहे. त्यातच वाहनांचा खड्ड्यात तोल गेल्यास वाहन उलटून अपघात होत आहेत. यात वाहन चालक व शेतकऱ्यांना दुखापती होत आहेत. खेतिया येथे कापूस विक्रीसाठी मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी तेथे कापूस विक्रीसाठी नेतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांना अपघात होऊन शेतमाल व वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.