नदीजोड प्रकल्प यशस्वीतेबाबत संशयच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:54 AM2017-09-10T11:54:05+5:302017-09-10T11:54:05+5:30
जलपरिषद : राजेंद्रसिह यांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नदीजोड प्रकल्पामुळे पाणी वाटपातले वाद आणखीच वाढतील. त्यामुळे देशात नदी जोड प्रकल्प यशस्वी होईल की नाही याबाबत शंकाच असल्याचे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलपरिषदेत बोलतांना व्यक्त केले.
शहिद दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीर परिसरात जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राजेंद्रसिंह यांनी सांगितले, सध्या सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्याठी योजना आखत आहे. परंतु नदीजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात तंटे वाढतील. परिणामी नदीजोड प्रकल्प यशस्वी होईल का? हा मोठाच प्रश्न आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार प्रकल्पात ठेकेदारी घुसल्यानंतर हे अभियान देखील आता भरकटू लागले आहे. लोकसहभागातून जी कामे होतील तीच या अभियानाच्या यशस्वीतेत भर घालतील असे आपण आधीच राज्य सरकारला सांगितले होते. परंतु आता तीन लाखांच्या वरची कामे थेट ठेकेदारांना दिली जात असल्यामुळे या अभियानाचे भवितव्य किती आणि कसे राहील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी शिवाजी भोईटे, चैत्राम पवार, प्रतिभा शिंदे, प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, सुमन पांडे, प्रा.डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.