सरकारी कर्मचाऱ्यांचा २६ ला लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:07 PM2020-11-25T12:07:47+5:302020-11-25T12:07:59+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे २६ नोंव्हेबर रोजी अस्वस्थ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे २६ नोंव्हेबर रोजी अस्वस्थ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा देशव्यापी लाक्षणिक संप होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार केला.
विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी देशातील कामगार, कर्मचारी, शिक्षक देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. यात सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण-कंत्राटीकरण धोरणे रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा, कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदा रद्द करा, केंद्रीय कर्मचाऱ्याना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा व ही पदे भरतांनाच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विना अट करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, वेतन श्रेणी त्रूटी दूर करण्या संदर्भात बक्षी समितीचा अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करा, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, दरमहा सात हजार ५०० बेरोजगार भत्ता मंजूर करा व प्रत्येक गरीब व्यक्तिला दरमहा १० किलो अन्नधान्यपुरवठा करा, प्रत्येक गरजू व्यक्तिला मनरेगा मार्फत किमान २०० दिवसाचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करा, इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करावी, अशी रास्त अपेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बैठकीस जिल्हाध्यक्ष हेंमत देवकर, हेमंत मरसाळे, एस.एन. पाटील, ओम कुलकर्णी, दिनेश रणदिवे, एम.डी. महिरे, सैय्यद इसरार अली, डी.पी. महाले, तुषार सोनवणे, हिरालाल घुले, भरत शिंदे, संजय पाटील, संदीप रायते, पवन शेटे उपस्थित होते.