तळोदा शहर : हस्तांतराअभावी शहरातील जनतेचे वीजेचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:41 PM2018-01-23T12:41:56+5:302018-01-23T12:42:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : हस्तांतराअभावी शहरातील विजेचे 12 ट्रान्सफार्मर अक्षरश: धुळखात पडले असून, इतर ट्रान्सफार्मावरील अतिरिक्त भारामुळे ग्राहकांना खंडीत वीज पुरवठय़ाबरोबरच कमी दाबाच्या पुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. वितरणकंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून हे ट्रान्सफार्मर तातडीने हस्तांतर करून कार्यान्वित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील वाढत्या वीज ग्राहक संख्येबरोबरच अतिरिक्त वीज भारामुळे येथील वीज वितरण कंपनीने आय पी.डी.एस. योजनेंतर्गत शहरासाठी 26 नवीन ट्रान्सफार्मरचा प्रस्ताव सन 2015-2016 ला पाठविला होता. साधारण दीड ते दोन कोटीचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावास शासनाने यंदा मंजुरी देवून 26 नवे ट्रान्सफार्मर मंजूर करून तसा ठेकादेखील ठेकेदारास देण्यात आला आहे. हे नवीन ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीने मराठा चौक, कॉलेज चौफुली, मिरा कॉलनी, श्रेयस कॉलनी, प्रतापनगर, हसमुखनगर, तापी माँ नगर, खान्देशी गल्ली, बढरी कॉलनी, विक्रमनगर, दामोदर नगर, बायपास रोड, विद्यानगरी, हातोडा रोड, न्यु हायस्कूल, मोठा माळी वाडा, संगम टेकडी, काका शेठ गल्ली, हरकलाल नगर, काशिनाथ नगर, शहादा रोड, सद्भावना हॉटेल अशा 26 ठिकाणे निश्चित केले आहे. यातील प्रतापनगर श्रेयस कॉलनी, हसमुखनगर, मिरा कॉलनी, दामोदर नगर, खान्देशी गल्ली, तापी मा नगर, मराठा चौक, अशा 12 ठिकाणी ठेकेदाराने ही ट्रान्सफार्मर उभेदेखील केले आहे. तथापि वीज वितरण कंपनीकडे हस्तांतराअभावी ते अजूनही कार्यान्वित झालेले नाही. अक्षरश: ते धुळखात पडलेले आहेत. वास्तविक ही ट्रान्सफार्मर उभे करून जवळपास एक ते दीड महिना झाला आहे. शिवाय तातडीने हस्तांतरणासाठी संबंधीत ठेकेदाराला कंपनीमार्फत सूचनादेखील दिल्याचे येथील कंपनीच्या अधिका:यांचे म्हणणे आहे, असे असताना मनमानीमुळे हस्तांतर होत नसल्याचा आरोप आहे. इकडे ग्राहकांच्या जोडण्या वाढल्यामुळे ट्रान्सफार्मरवर वीजेचा प्रचंड भार वाढला असल्याने सातत्याने तांत्रिक बिघाडाचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी ग्राहकांना सतत खंडीत वीजपुरवठय़ाच्या समस्येस तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा आहे. साहजिकच नागरिकांचा रोष उपस्थित अधिका:यांना पत्करावा लागत आहे. ट्रान्सफार्मरची अशी वस्तुस्थिती लक्षात घेऊन या बारा ठिकाणी ट्रान्सफार्मर सुसज्जपणे उभे करण्यात आले आहे. ते हस्तांतरणासाठी संबंधितांनी सक्त ताकीद द्यावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.