तळोदा पोलीस ठाण्यात वाहन नसल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:13 PM2018-03-15T12:13:18+5:302018-03-15T12:13:18+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.
तळोदा येथील पोलीस ठाण्यास तळोदा तालुक्यातील 128 गावे जोडली आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील तळोद्याच्या सीमेस लागून असलेली नऊ गावेदेखील जोडलेली आहे. या पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ 66 मैलार्पयत विस्तारलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा ठाणे असे एकमेव आहे की, ज्याच्यात दोन तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सदर पोलीस ठाण्यास बोरद, मोदलपाडा व कोठार अशा तीन दूरक्षेत्रांचादेखील बंदोबस्ताच्या पाश्र्वभूमिवर विभागणी करण्यात आली आहे. साहजिकच सातपुडय़ातील माळखुर्द, एकधड, बोरवन, टाकली, अशा अनेक गावे अन् पाडय़ांचा समावेश या ठाण्यात आहे, असे असले तरी या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस विभागाकडून एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे याच पोलीस गाडीवर एवढा मोठा बंदोबस्ताचा गाडा कसा तरी सुरू आहे.
साहजिकच पोलिसांनाही यातून मोठी कसरत करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे. वास्तविक पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार पाहता येथे दुस:या चारचाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दुस:या वाहनाबाबत येथील पोलीस प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. मात्र कायम स्वरूपी वाहन उपलब्ध करून न देता तात्पुरते वाहन दिले जाते. नंतर पुन्हा ते परत मागवून घेण्यात येते. गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरात घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. वसाहतींमध्ये सातत्याने होणा:या घरफोडय़ा आता शहराच्या मध्यभागीदेखील होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. मात्र एकाच वाहनावर ते अशक्य आहे. त्यातही तालुक्यात ग्रामीण भागात रात्री-बेरात्री मारामारी, दंगल, अशा घटना घडल्या तर पोलिसांना तेथे जावे लागते, अशा वेळी पोलिसांना आपल्या खाजगी दुचाकीने रात्रीची गस्त घालावी लागत आहे. गृहविभागाने पोलीस ठाण्यास आणखीन एक चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले तर दुर्घटना अथवा मारामारी दंगलीच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल. शिवाय घटनांवरही काबू राखता येईल. त्याचबरोबर तपास कामातही तातडीने गती मिळेल. एकाच वाहनामुळे तासन-तास वाट पहावी लागते, अशीही पोलिसांची व्यथा आहे.
जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना वरिष्ठ प्रशासनाकडून दोन वाहने दिलेली आहेत. परंतु तळोदा पोलीस ठाण्यालाच केवळ एकमेव गाडी देण्यात आलेली आहे. तळोद्याच्या बाबतीत प्रशासनाचा अशा दुजाभाव का केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर अशा वेळी दुस:यांकडून वाहन मागविण्यात येत असते. दुस:या वाहनाअभावी येथील पोलिसांचा वाढता ताण कमी करण्यासाठी गृहविभागाने गंभीर दखल घेवून तातडीने वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.