१३९ आश्रम शाळांमध्ये उद्यापासून अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:39 PM2020-11-30T12:39:50+5:302020-11-30T12:39:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १३९ आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नववी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील १३९ आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नववी ते बारावीचे साधारणत: साडेआठ हजार विद्यार्थी असून त्यापैकी ७० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. आश्रम शाळेत केवळ इंग्रजी, गणित व विज्ञानच्याच तासिका होणार आहेत. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी जवळपास पुर्णत्वास आली आहे. त्यातील एक टक्केपेक्षा कमी कर्मचारी पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत.
शासनाने १ डिसेंबरपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्याने त्या दृष्टीने नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत तयारी करण्यात येत आहे. शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता यासह इतर बाबींसाठी कर्मचारी २१ नोव्हेंबरपासून शाळेवर हजर राहत आहेत. आश्रम शाळेत विद्यार्थी आणण्याची मोठी कसरत आता शिक्षकांना पार पाडावी लागत आहे.
आवश्यक तयारी पुर्ण
नंदुरबार जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालय मिळून एकुण १३९ आश्रमशाळा आहेत. त्यात ७४ शासकीय तर ६५ अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. याशिवाय ४७ वसतिगृहे आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता एकुण साडेआठ हजार विद्यार्थी आहेत. दुर्गम भागातील आश्रम शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासह इतर कामांना वेग देण्यात आला होता. जवळपास सर्वच आश्रम शाळांमध्ये आवश्यक ती तयारी पुर्ण करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांंचे संमती पत्र
दोन्ही प्रकल्प मिळून जवळपास साडेआठ हजार आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र भरून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी असे पत्र भरून दिले आहे. विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी आता शिक्षक आणि संस्थाचालकांना घ्यावी लागणार असल्यामुळे शिक्षक व कर्मचारी वर्ग अलर्ट झाला आहे.
कोरोना चाचणी
शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या. दोन्ही प्रकल्प मिळून एक टक्केपेक्षा कमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत केवळ ११ कर्मचारी पॅाझिटिव्ह आले आहेत. शिक्षकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आहार शाळेतच शिजविणार
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आहार शाळेतच शिजवून देणार आहेत. त्यासाठी सात दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व इतर साहित्य खरेदी करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. सेंट्रल किचनमधून २१ शाळांना शिधा वाटप केले जात आहे. शाळांनी ते शिजवून विद्यार्थ्यांना आवश्यक तसे वाटप करणे आवश्यक आहे.
केवळ तीन विषयांचे अध्यापन
आश्रम शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत असले तरी त्यात केवळ तीन विषयांचेच अध्यापन करण्यात येणार आहे. त्यात इंग्रजी, विज्ञान व गणिताचा समावेश आहे. इतर विषयांचे अध्यापन पुर्वीप्रमाणेच राहणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन आधीपासूनच झाले आहे.
संस्थाचालकांनी खरेदी करावे... : वर्ग खोल्या सॅनिटाईझ करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी खाजगी आश्रम शाळांच्या संस्थाचालकांची राहणार आहे.