धानोरा येथून दोन लाख रुपयांचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त
By भूषण.विजय.रामराजे | Updated: September 14, 2023 19:14 IST2023-09-14T19:09:52+5:302023-09-14T19:14:15+5:30
धानोरा येथे हिराभाई भिलाभाई शिकलीकर याच्या घराजवळ पडक्या जागेत लाकूड साठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती.

धानोरा येथून दोन लाख रुपयांचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील धानोरा येथून दोन लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. बुधवारी रात्री तपासणी पथकाने या ठिकाणी धाड टाकून लाकूड हस्तगत केले.
धानोरा येथे हिराभाई भिलाभाई शिकलीकर याच्या घराजवळ पडक्या जागेत लाकूड साठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने या ठिकाणी भेट देत तपासणी केली असता, सागाचे दोन लाख रुपयांचे लाकूड मिळून आले. संबंधिताकडून सागवानी लाकडाचे चिरकाम केलेले दरवाजे फळी, चौकट नग, सोफा आदी लाकडी सामान तसेच लाकूड कटाईचे मशीन मिळून आले.
याप्रकरणी तलावपाडा वनरक्षकांनी वन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वनसंरक्षक ऋषिकेश, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी एस.एम. सदगीर, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल सुनंदा वेंदे, वनरक्षक सुनील करवंदकर, बिलाल शाह, लक्ष्मण पवार, भानुदास वाघ यांनी केली.