मीटर नसताना दहा हजारांचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:58+5:302021-07-16T04:21:58+5:30
अक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वीज मीटर न बसविलेल्या तसेच कुठल्याही प्रकारची वीजजोडणी केली नसतानादेखील अनेकांना हजारो रुपयांचे ...
अक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वीज मीटर न बसविलेल्या तसेच कुठल्याही प्रकारची वीजजोडणी केली नसतानादेखील अनेकांना हजारो रुपयांचे वीज बिल येत आहे. खुंटगव्हाण या दुर्गम भागातील गावातील एका घरात जाेडणी नसतानाही १० हजारांचे वीज बिल देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अतिदुर्गम भागातील उमरागव्हाण, अंबारी, खुंटागव्हाण या गावांना अद्यापही पूर्ण क्षमतेने विजेची प्रतीक्षा आहे. परंतु असे असतानाही येथील ७० च्या जवळपास ग्राहकांना हजारो रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. खुंटागव्हाण येथील सात जणांना प्रथमच हजारो रुपयांची थकबाकी असलेले वीज बिल देण्यात आले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत वरिष्ठांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान खुंटागव्हाण येथील सूर्या बुल्या वसावे यांच्याकडे वीज मीटरच नसताना दहा हजार ६२० रुपयांचे वीज बिल विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जमाना परिसरात असलेल्या या गावांमध्ये विद्युत मीटर अथवा विद्युत जोडणी नसतानादेखील हजारो रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याचा हा प्रकार धक्कादायक असून या प्रकाराची चौकशी होणे क्रमप्राप्त ठरते विद्युत बिल देण्यात आलेल्या नागरिकांना कोणतीही जोडणी न करता विद्युत बिल कसे देण्यात आले कदाचित कागदोपत्री यांना विद्युत मीटर व विद्युत जोडणी पूर्ण केल्याचे तर दाखविण्यात आले नाही ना, अशी शंका निर्माण झाली असून या बाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याच्या देखील संशय व्यक्त केला जात असून याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने चौकशीचे आदेश देऊन यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे.