खून प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी : खापरची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:09 PM2018-02-22T13:09:55+5:302018-02-22T13:10:46+5:30
शहादा न्यायालयाचा निकाल
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : सामाईक शेतीच्या बांधावर बैल चारण्याचा वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, खापर येथील लक्ष्मण पाडवी व अनिल रुपजी पाडवी हे सामाईक शेती करीत होते. त्याच्या शेतात असलेल्या बांधावर लक्ष्मण पाडवी हे 12 ऑगस्ट 2015 रोजी गुरे चारत होते. त्यावेळी तेथे आलेले अनिल पाडवी यांनी सामाईक बांधावर गुरे चारू नको म्हणून त्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अनिल पाडवी यांनी नांगरच्या लोखंडी पासने लक्ष्मण यांच्या डोक्यावर व पायावर वार केला. रुग्णालयात उपचार घेतांना लक्ष्मण पाडवी यांचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण पाडवी यांची बहिण नुतनबाई अमरसिंग वसावे यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून अनिल पाडवी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक राजेंद्र भावसार, हवालदार जी.एफ.पावरा यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्या.नायकवाड यांच्यासमोर हा खटला चालला. एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकुण न्या.नायकवाड यांनी अनिल पाडवी यांना खुन प्रकरणी दहा वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. पोलीस पैरवी अधिकारी नासीरखान पठाण यांनी सहाय्य केले.