इमारतीसाठी आताशी निविदा प्रक्रिया सुरू : आंतरराष्ट्रीय शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:42 PM2018-06-16T12:42:14+5:302018-06-16T12:42:14+5:30
यंदाही तोरणमाळऐवजी नंदुरबारातच सुरू राहणार
नंदुरबार : तोरणमाळला मंजूर झालेली पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा इमारतीअभावी सलग दुस:या वर्षी नंदुरबारात भरत आहे. शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता. आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात ही शाळा सुरू आहे. दरम्यान, तत्कालीन शिक्षण संचालक नंदकुमार यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी तिला आकार दिला.
तोरणमाळ केंद्रांतर्गत दुर्गम भागातील गाव-पाडय़ांमधील शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी व्हावे, सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तोरणमाळ येथे निवासी शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. तत्कालीन शिक्षण संचालक नंदकुमार यांनी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय निवासी शाळा मंजूर करून घेतली. गेल्या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी अनेक अडचणींना तोंड देत ही शाळा सुरू झाली. यंदा शाळेचे दुसरे वर्ष आहे. परंतु सर्वच कारभार हा उधार- उसनवारीवर सुरू असल्याचे चित्र यंदाही कायम आहे.
धडगाव गटातील तोरणमाळ केंद्रात 852 शाळाबाह्य मुले सव्रेक्षणात आढळून आली होती. तोरणमाळ केंद्र हे अतिदुर्गम भागात आहे. तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण 29 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 1665 मुले शिक्षण घेत होती.
येथील वाडे-पाडे विखुरलेले असल्यामुळे शाळेपासून अशा वस्तींचे अंतर अधिक असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे. शिवाय शाळा बांधकामासाठी साहित्य नेण्यास दळणवळणाचादेखील अभाव आहे. परिणामी सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी निवासी शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाली.
उद्देश कायम राहावा
आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याचा तत्कालीन शिक्षण संचालकांचा उद्देश या भागातील विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शिक्षण मिळावे हा होता. तो उद्देश कायम राहावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करून यंदा शाळा सुरळीत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदकुमार यांची बदली झाल्याने आता नवीन अधिकारी कितपत गांभीर्य ठेवतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.