विहिरीची जागा निश्चित नसतांना निघाले टेंडर, जि.प.स्थायी समितीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:38 PM2020-11-28T12:38:46+5:302020-11-28T12:38:53+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विहीरीची जागाच निश्चित नसताना त्याचे टेंडर ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विहीरीची जागाच निश्चित नसताना त्याचे टेंडर निघाल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत समोर आला. परंतु पाणी पुरवठा विभागाने नेहमीप्रमाणे नकारघंटा वाजवीत पळवाट शोधली.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली ॲानलाईन झाली. सभेला उपाध्यक्ष राम रघुवंशी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सदस्य धनराज पाटील, देवमन पवार ,सी.के. पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
आष्टे गटातील सदस्य देवमन पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. ठाणेपाड्यात आदिवासी विकास विभागामार्फत ११ कोटी रुपये खर्चून आश्रम शाळेची इमारत उभी आहे. मात्र तेथे विद्यार्थ्यांसाठी पाणी नाही. पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून तीस लाखाचा निधी आला आहे मात्र विहिरीची जागा निश्चित नसताना त्याचे टेंडर मात्र निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. आणि जर टेंडर काढले आहे तर मग कामही सुरू झालेले नाही. यावर पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता वळवी यांनी सांगितले की टेंडर निघालेले नाही. प्रस्ताव मंजूर होता मात्र वनविभागाने जागा नाकारली आहे. विहिरीसाठी पुन्हा सर्वेक्षण करून जागा निश्चित होईल यासाठी पुढील प्रक्रिया राबविली गेली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी ही फाईल मागवली असून ते स्वतः याची खात्री करून घेणार आहेत .पवार यांनी गुजरात मध्ये अंगणवाडी चे अनेक लाभार्थी व गरोदर महिला गेले असून त्यांचा आहार कोणाला दिला जातो याची चौकशी करावी कारण त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. आक्टोबर मध्ये ९७ टक्के आहाराचे वाटप झाले आहे. मात्र धडगाव व इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील इतर सदस्य हा आहार घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी सांगितले. आष्टे गटातील अंगणवाडीतील सुपरवायझर यांच्या बदल्या झाल्याने या ठिकाणची पदे रिक्त असल्याने ते त्वरित भरावी अशी मागणी पवार यांनी केली. अध्यक्षा वळवी यांनी अंगणवाडी चा आहार हा १०० टक्के वाटप व्हावा यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. धनराज पाटील यांनी रिक्त जागा लवकर भरावेत अशी मागणी केली.