उपसरपंचाने पुलावरून उडी मारून संपविली जीवनयात्रा
By मनोज शेलार | Published: February 26, 2024 05:18 PM2024-02-26T17:18:59+5:302024-02-26T17:19:26+5:30
गिरासे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास तापी पुलावर आले.
नंदुरबार : रामी, ता. शिंदखेडा येथील विद्यमान उपसरपंचांनी सोमवारी दुपारी सारंगखेडा, ता.शहादा येथील तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
रामी, ता. शिंदखेडा जिल्हा धुळे येथील विद्यमान उपसरपंच जवानसिंग काशिनाथ गिरासे (४३) असे मयताचे नाव आहे. गिरासे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास तापी पुलावर आले. पुलावर त्यांनी पॅन्ट आणि चप्पल काढून अचानक तापी पात्रात उडी घेतली. काही कळण्याच्या आत ही घटना घडल्याने पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी आरडाओरड केला. घटनेची माहिती सारंगखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ पुलावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी वाहतूककोंडी सुरळीत केली.
जवानसिंग शहादा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रामी आणि पथारे येथील अनेक जण या कार्यक्रमात होते. टाकरखेडा येथील मासेमारी करणारे तरुण रमेश, लक्ष्मण, धनराज यांनी मृतदेह शोधण्यासाठी मदत केली. त्यांनी जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह शोधून नातेवाईकांच्या सुपूर्त केला. यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. सदरील हद्द दोंडाईचा ठाणे अंतर्गत येत असल्याने सारंगखेडा येथील सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दोंडाईचा पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरून दोंडाईचा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.