Video - गळक्या बसमुळे चालक व वाहकाने रेनकोट घालून काढली रात्र
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: December 1, 2023 06:28 PM2023-12-01T18:28:25+5:302023-12-01T18:34:25+5:30
गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र बरसत आहे. त्याचा फटका एसटीलाही बसला आहे.
नंदुरबार :अवकाळी पावसाने सर्वांचीच धांदल उडवली असताना गळक्या एसटीचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. शिरपूर आगारातून पानसेमल (मध्य प्रदेश) येथे मुक्कामी गेलेल्या बसच्या टपावरुन रात्रभर पाणी टपकत असल्याने वाहक व चालकाला अक्षरश: रेनकोट घालून रात्र काढावी लागल्याची घटना समोर आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र बरसत आहे. त्याचा फटका एसटीलाही बसला आहे. काही गावांचे रस्ते बंद झाल्याने फेऱ्या कमी झाल्या असून पावसामुळे प्रवाशांनीही प्रवासाचा बेत रद्द केल्याने एसटीच्या उत्पन्नावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यातच नादुरुस्त व गळक्या बसेसचा प्रश्न चव्हाट्यावर आला. गुरुवारी शिरपूर आगारातून पानसेमल येथे मुक्कामी बस गेली होती. मात्र पाऊस असल्याने बसच्या टपावरुन सातत्याने पाणी टपकत होते.
चालक व वाहकाला एसटीमध्येच मुक्काम करावा लागत असल्याने त्यांना टपावरुन टपकणाऱ्या पाण्याच्या संरक्षणासाठी अक्षरश: रेनकोट घालून जागरण करावे लागले. संपूर्ण बस गळत असल्याने ओलीचिंब झालेल्या बसमध्ये मुक्कामी आलेल्या वाहक व चालकास बसण्यास देखील जागा राहिली नव्हती. सकाळी उठून या चालक व वाहकावर प्रवाशांची देखील मोठी जबाबदारी असताना एसटी प्रशासनातर्फे चालक व वाहकासाठी कुठल्याही उपाययोजना नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
नंदुरबार :अवकाळी पावसाने सर्वांचीच धांदल उडवली. शिरपूर आगारातून पानसेमल (मध्य प्रदेश) येथे मुक्कामी गेलेल्या बसच्या टपावरुन रात्रभर पाणी टपकत असल्याने वाहक व चालकाला रेनकोट घालून रात्र काढावी लागल्याची घटना समोर आली आहे. pic.twitter.com/Dte7oonYLM
— Lokmat (@lokmat) December 1, 2023