महाराष्ट्रातील पहिल्या मतदार राहतात गुजरातेत
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: April 11, 2024 11:23 AM2024-04-11T11:23:23+5:302024-04-11T11:23:53+5:30
पहिले मतदान केंद्र मणिबेली उपेक्षितच
रमाकांत पाटील
नंदुरबार : लोकसभेचा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. याच मतदारसंघातील पहिले मतदान केंद्र अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, तर येथील मतदार यादीतील पहिल्या क्रमांकाच्या मतदार आहेत ४६ वर्षांच्या रविता पंकज तडवी. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील या पहिल्या मतदार सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असून मतदान महाराष्ट्रात येऊन करणार आहेत.
कोण आहे पहिल्या क्रमांकाची मतदार
मतदार यादीतील पहिल्या क्रमांकावर रविता पंकज तडवी ही महिला आहे. त्या पुनर्वसित असून, त्यांचे पुनर्वसन गुजरातमधील परवेटा येथे झाले आहे. मात्र, मतदान येथेच असल्याने निवडणुकीसाठी मतदानाला त्या येथे येणार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत पहिले नाव वरसन वसावे यांचे होते. मात्र, मणिबेली केंद्राच्या सुधारित यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावरून खाली गेले आहे.
मणिबेली हे मतदान केंद्र अतिदुर्गम भागात असून, याठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांनाही दोन दिवस आधीच निघून नर्मदेच्या पाण्यातून प्रवास करीत केंद्र गाठावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील पहिले बुडीत गाव म्हणजे मणिबेली. या गावात आजही ३४१ मतदार असून, हे गाव गेल्या चार दशकांपासून कधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे तर कधी निवडणुकीतील वेगळेपणामुळे चर्चेत आहे.
पुनर्वसनानंतर याठिकाणी सुमारे ४५० नागरिक वास्तव्यास आहेत. गावाला जाण्यासाठी आजसुद्धा पक्का रस्ता नाही, गावात वीज नाही आणि नर्मदेच्या काठावर असले, तरी पाण्याची तीव्र टंचाई आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकला होता.