राज्यस्तरीय जनजाती महोत्सवाचे राज्यपाल करणार उद्घाटन
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: November 11, 2023 08:35 PM2023-11-11T20:35:55+5:302023-11-11T20:37:43+5:30
नंदुरबारातील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
नंदुरबार : आदिवासींचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात तीन दिवसीय जनजाती दिवस महोत्सवाचे होणार आहे. त्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. नंदुरबारातील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी देशभर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती दिवस म्हणून साजरा केली जाणार आहे. नंदुरबारात राज्यस्तरीय जनजाती दिवस महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी लोकनृत्य, हस्तकला, आदिवासी बांधवांच्या विविध पारंपरिक वेशभूषा, आभूषणे यांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा जाहीर झाला आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी ऐन सुटीच्या कालावधीत प्रशासनाला धावपळ करावी लागणार असल्याचे चित्र आहे.