आजोबांचा नातवाने केला मित्राच्या मदतीने खून; हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले स्तब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:38 IST2024-12-10T12:37:04+5:302024-12-10T12:38:05+5:30
अवघ्या चार तासांत पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

आजोबांचा नातवाने केला मित्राच्या मदतीने खून; हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले स्तब्ध
शहादा : वडिलांना सतत टोचून बोलून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा राग येऊन नातवाने आपल्या मित्राच्या साहाय्याने ६० वर्षीय आजोबाचा खून केल्याची घटना शिरूड रस्त्यावर घडल्याने खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या साडेचार तासात पोलिसांनी या घटनेचा तपास लावत दोन अल्पवयीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. दशरथ शंकर राजे (६०) रा. शहादा असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी दशरथ राजे हे आपला मोठा मुलगा भरत राजे याच्या मीरा नगर येथील घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून ते पुन्हा आपल्या तापी रेसिडेन्सी येथील घरी परत येत असताना रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान त्यांचा खून झाला. नातू व त्याचा मित्र या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करीत त्यांना गंभीर जखमी करून त्यांना तेथे सोडून त्यांची स्कूटी घेऊन पसार झाले. रात्री नऊ वाजले तरी आपले वडील घरी आले नाही म्हणून मयत दशरथ राजे यांचा दुसरा मुलगा राहुल हा त्यांना शोधत जात असताना रस्त्यावर गॅस गोडाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक वृद्ध रस्त्यावर पडलेला दिसल्याने काही अपघात घडला असावा अशा शंकेने राहुल हा त्यांच्याकडे गेला. तेथील चित्र पाहताच त्यांना धक्काच बसला. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्यांनी आक्रोश केला. पोलिसांना माहिती देण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी दशरथ राजे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना त्यांचा मृत्यू झाला. हवालदार भरत उगले यांना मिळालेल्या माहितीनुसार, मयताच्या नातवाने त्यांच्यावर हल्ला केला केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित अल्पवयीन आरोपी व त्याचा मित्र हे खेतिया रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसले. अधिक तपास केला असता दरा फाट्याजवळ म्हसावदकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कूटी उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्कूटी ताब्यात घेतली. इकडे दोन्ही संशयित घरी आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. अवघ्या चार तासांत पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
संशयित अल्पवयीन, गुन्ह्याची दिली कबुली...
आजोबा हे वडिलांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देत असल्याने आपण त्यांचा खून केल्याची कबुली नातवाने दिली. त्यासाठी एका मित्राच्या साहाय्याने आपण स्कूटी म्हसावद रस्त्यावर लावली, तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकू एका मित्राच्या मदतीने पेट्रोल पंपाच्या पुढे डोंगरगाव रस्त्याला लपविल्याचे सांगितले. रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचेही त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आजोबाचा खून करणारा नातू व त्याचे सहकारी मित्र हे अल्पवयीन आहेत. ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच एक खून अल्पवयीन मुलांकडून घडल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी रात्री अशीच घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एका आरोपीची संख्या वाढू शकते, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी राजन मोरे यांनी दिली. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप सिंह मोहिते, सहायक फौजदार प्रदीप राजपूत, हवालदार देवा विसपुते, दिनकर चव्हाण, भरत उगले, युवराज राठोड, भगवान साबळे यांच्या पथकाने केला.