आमदारांनी समाज कल्याण सभापतींच्या दालनालाच ठोकले टाळे
By मनोज शेलार | Published: September 11, 2023 05:57 PM2023-09-11T17:57:31+5:302023-09-11T17:58:27+5:30
समाज कल्याण सभापतींचेही कामकाज आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीच करण्याचा उपरोधिक सल्लादेखील त्यांनी दिला.
नंदुरबार : दिव्यांगांचे काम ज्या विभागाकडे असते त्या विभागाच्या जिल्हा परिषद सभापतींचे नाव दिव्यांगांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाही, आमंत्रणदेखील नाही. शिवाय आपणदेखील लोकप्रतिनिधी असताना आपलेही नाव पत्रिकेत नव्हते. आम्हा दोन्ही बाप-लेकांना मुद्दाम टाळल्यानेच निषेध म्हणून मुलाच्या अर्थात जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतींच्या कार्यालयास टाळे लावल्याची माहिती शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी दिली.
आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले, नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार येथे आले होते. यावेळी असलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपण लोकप्रतिनिधी असतानाही निमंत्रित करण्यात आले नाही. तसेच आपले पूत्र जि. प. समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नाही. असे असेल तर समाज कल्याण सभापतींचे कार्यालय कशासाठी? यावर राग व्यक्त करत व निषेध म्हणून थेट समाज कल्याण सभापतींच्या दालनालाच टाळे ठोकून चाव्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिल्याचे स्पष्टीकरण आमदार पाडवी यांनी दिले.
समाज कल्याण सभापतींचेही कामकाज आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीच करण्याचा उपरोधिक सल्लादेखील त्यांनी दिला. यापुढे जेव्हा जेव्हा असे प्रकार होतील त्या त्या वेळी अशीच भूमिका घेतली जाईल, असा इशाराही आमदार पाडवी यांनी दिला. याशिवाय अक्कलकुवा येथे दोन दिवसांपूर्वी ‘पोलिस दादाहा सेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या शहरात हा कार्यक्रम असताना तेथेही आपल्याला बोलविण्यात आले नाही, हा लोकप्रतिनिधीचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.