पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापतींसह सदस्यांनीच टाकला बहिष्कार
By मनोज शेलार | Published: October 12, 2023 05:21 PM2023-10-12T17:21:07+5:302023-10-12T17:21:27+5:30
लोंढे यांच्या विषयीची नाराजी व अविश्वास प्रस्तावाचे दिलेले पत्र यामुळे आजच्या सभेवर देखील सभापतींसह सर्वच २० सदस्यांनी बहिष्कार टाकला.
नंदुरबार : अक्कलकुवा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्तावाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी बोलविण्यात आलेल्या सभेला एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. त्यामुळे बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या कार्य पद्धतीला कंटाळून त्यांच्याविरुद्ध १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी लोंढे यांनी मासिक बैठक बोलविली होती.
लोंढे यांच्या विषयीची नाराजी व अविश्वास प्रस्तावाचे दिलेले पत्र यामुळे आजच्या सभेवर देखील सभापतींसह सर्वच २० सदस्यांनी बहिष्कार टाकला. बैठकीच्या नियोजित वेळेत सर्व अधिकारी उपस्थित होते. २० मिनिटे वाट पाहूनही एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने अखेर बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान, गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.