तापीची पाणीपातळी वाढली, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले
By मनोज शेलार | Published: September 16, 2023 06:06 PM2023-09-16T18:06:07+5:302023-09-16T18:06:33+5:30
माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे.
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : खानदेशात दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे ३२ दरवाजे तीन मीटरने उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग तापी नदीच्या पात्रात सुरू झालेला आहे. त्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे अनुक्रमे तीन व चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी पात्रात साधारणता ३ लाख ३० हजार ६५४ क्यूसेक पाण्याच्या विसर्ग होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी सकाळी आठ वाजता सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडल्याने तापी नदीत अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग प्रकाशा व तहसीलदार शहादा यांना पत्राद्वारे आदेश देण्यात आलेले आहेत. सारंगखेडा बॅरेजचे तीन दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. यातून सुमारे ६९,३२३ क्यूसेक पाण्याच्या विसर्ग होणार आहे. तर प्रकाशा बॅरेजचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ७३,९८५ क्यूसेक पाण्याच्या विसर्ग होईल. १२ ते २४ तासांत ३ लाख क्यूसेक पाण्याच्या विसर्ग तापी नदीच्या पात्रात होणार आहे. तापी नदीच्या काठावरील नागरिकांनी संभाव्य पूर परिस्थिती पाहता सावधगिरी बाळगावी. कोणीही नदीच्या पात्रात जाऊ नये. गुरांना देखील नदीपात्राच्या ठिकाणी नेऊ नये, असे आवाहन तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले आहे. शहादा तालुक्यातदेखील जोरदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.