गावच्या युवकाने ॲपलला केले अलर्ट; मिळाले तब्बल 11 लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 08:37 AM2023-02-18T08:37:46+5:302023-02-18T08:40:01+5:30
डाटा सुरक्षित राहण्यासाठी दिला मोलाचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा (जि. नंदुरबार) : लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाऊ नये, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना ॲपल कंपनीने ग्राह्य धरून अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील एका तरुणाला ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. ओम कालिदास कोठावदे असे या युवकाचे नाव आहे.
ॲपल कंपनीचा लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची भीती ओमला जाणवली. त्या अनुषंगाने त्याने शोध सुरू केला. चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंददरम्यान लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले. त्यावर उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला. ॲपल कंपनीच्या निदर्शनास ती त्रुटी आली व त्यांनी तत्काळ तसे करून बघितल्यास खरंच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांना निर्माण झाली. ओमने केलेल्या कार्याचे ॲपलने कौतुक केले व आभार मानले आहेत. या तरुणाला ॲपल कंपनीकडून १३ हजार ५०० डॉलर म्हणजेच जवळपास ११ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. आश्रमशाळा पेचरीदेव, ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावदे यांचा तो मुलगा असून, त्याचे शिक्षण नंदुरबार येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण तो सध्या पुणे येथे घेत आहे.
कंपनीची समस्या सुटली...
nॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाई करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे.
nतुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत आभार मानले आहेत.