केसांच्या चोरीतील चोरटे पोलीसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:50 AM2020-01-28T11:50:28+5:302020-01-28T11:50:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराच्या पटेलवाडी भागातील एका भांड्यांच्या गोडाऊनमध्ये दरोडा टाकून त्यातील सहा लाखाचे महिलांचे केस व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराच्या पटेलवाडी भागातील एका भांड्यांच्या गोडाऊनमध्ये दरोडा टाकून त्यातील सहा लाखाचे महिलांचे केस व ५० हजाराचे भांडे चोरट्यांनी लांबविले होते. या गुन्ह्यासाठी स्थानिक अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे गतीमान करीत दोन्ही संशयित आरोपींसह २८ हजाराचा मालही ताब्यात घेतला, तर तिसरा आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार शहराच्या पटेलवाडी भागात सलिम जुम्मा खाटीक यांचे भांड्यांचे गोडाऊन आहे. २ जानेवारी रोजी या गोडाऊनचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सहा लाखाचे १५० किलो महिलांचे केस व ५० हजाराचे भांडे चोरुन नेले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. या घटनेचा तपास लावण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे गतिमान केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांवर पाळत ठेवले. तपास सुरू असतानाच पोलीसांना पुन्हा या चोरीतील संशयित हे नवनाथ महाराज टेकडीवर लपून बसल्याची माहिती मिळाली.
तपास पथकातील पोलीस त्या ठिकाणी पोहोचताच संश्यितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक वाढला. दरम्यान विश्वासात घेत विचारपूस केली असता अमिन उर्फ आमऱ्या शाह रुस्तम शहा व इम्रान शाह सिराज शाह दोन्ही रा.शार्दुला नगर नंदुरबार अशी त्यांची नावे असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत शकिल शाह जानू शाह रा.शार्दुला नगर नंदरबार हा तिसरा संशयित सहकारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरा संशयित फरार असून त्याने काही माल आरंगाबाद येथे विकला तर काही माल दोंडाईचा येथे विकल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांया मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, राकेश मोरे, प्रमोद सोनवणे, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, यशोदीप ओगले, आनंदा मराठे व अविनाश चव्हाण यांच्या पथकाने केली.
दोंडाईचा येथील एका व्यापाºयालाही ताब्यात घेत त्याची विचारपूस केली. त्यात त्याने केस विक्रीसाठी आणले होते. परंतु काही दिवसासाठी माझ्याकडे ठेवले होते, हे केस अमिन शाह हा परत घेऊन जाणार होता, परंतु नंतर तो आलाच नसल्याचे दोंडाईचा येथील व्यापाºयाने सांगितले. त्यातील २८ हजाराचे सात किलो महिलांचे केस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दोंडाईचापर्यंत तपास करतांना काही माल औरंगाबाद येथे विकल्याचेही आढळून आले आहे. औरंगाबाद येथे माल विकणारा हा तिसरा संशयित असून तो अद्याप फरार असल्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.