चोऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा कारनामा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:51 PM2020-07-26T12:51:06+5:302020-07-26T12:51:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री मंगळबाजारात ओळीने तीन दुकाने फोडून पोलिसांना आव्हान देणारे सराईत चोरटे नसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री मंगळबाजारात ओळीने तीन दुकाने फोडून पोलिसांना आव्हान देणारे सराईत चोरटे नसून अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. पाच पैकी दोन अल्पवयीन चोरट्यांना एलसीबीने अटक केली आहे. तिघांचा शोध सुरू आहे.
मंगळबाजारातील दुकान फोडीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने पथकाला कामाला लावले होते. या चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत हे नंदुरबारातीलच माळीवाडा भिलाटीतील असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार निरिक्षक नवले यांनी पथकाला सुचना दिली. संशयीत मुलं ही शहरातील ईदगाह मैदान परिसरात फिरत असल्याचे समजले. पथकाने त्या भागात तपासाला सुरुवात केली असता टेकडीच्या मागील बाजूस तीन ते चार मुल संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसले. पथकाने शिताफीने मुलांजवळ जाऊन त्यांच्यावर झडप घातली. परंतु त्यातील काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मंगळ बाजारातील दुकान फोडीच्या घटनेची कबुली दिली. आपल्यासोबत आणखी तीनजण असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय घटनेतील चोरीचा किराणा माल देखील काढून दिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, राकेश वसावे, अभय राजपूत, आनंदा मराठे, राजेंद्र काटके यांनी केली.