वृद्धांच्या मृत्यू संख्येत होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:32 PM2020-07-20T13:32:53+5:302020-07-20T13:33:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे मृत्यू संख्या वाढतच असून रविवारी पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला. शहादा व नवापूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे मृत्यू संख्या वाढतच असून रविवारी पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला. शहादा व नवापूर येथील वृद्धांचा त्यात समावेश आहे. चार दिवसात चार वृद्धांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकुण मयत संख्या २० झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आकडा आता चारशेच्या घरात पोहचला आहे. त्याच बरोबर मयतांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूसंख्या केवळ ९ होती ती वाढून २० पर्यंत गेली आहे. मयतांमध्ये सर्वाधिक वृद्धांचा समावेश आहे. एकुण २० पैकी १२ जण हे ६० वर्ष वयापेक्षा अधीक वयोगटातील आहेत. यातील अनेकांना इतरही आजार होते. शिवाय विविध आजारांवरील शस्त्रक्रिया देखील झालेल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या एकुण ३५९ झाली आहे. रात्री उशीरापर्यंत आणखी काही जणांचे अहवाल येण्याची शक्यता आहे.
शहादा येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते. तेथेच ते पॉझिटिव्ह झाले होते. त्यांना १८ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा १९ रोजी मृत्यू झाला. याशिवाय नवापूर येथील नारायणपूर रोड भागात राहणारे ७२ वर्षीय वृद्ध देखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना त्यांचा रविवार, १९ रोजी मृत्यू झाला. दिवसभरात एकुण दोन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय गांधीनगर भागातील ५३ वर्षीय बाधिताचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
कोरोनाबाधीतांची मृत्यूसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. चार दिवसांपासून दररोज मृत्यू होत असल्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे. यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वयोवृद्धांना विनाकारण घराबाहेर पडू देऊ नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सायंकाळी व सकाळी फिरणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या अधीक असल्याचे दिसून येत आहे. याबाबतही प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
४जिल्ह्यातील बाधितांची संख्या पावणेचारशेच्या घरात गेली आहे. दररोज किमान १० ते २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. यात सर्वाधिक नंदुरबार व शहादा तालुक्यातील बाधितांचा समावेश आहे.
४रविवारी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर दोन मयतांचा देखील स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. यात नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटी, गांधीनगर, मच्छिबाजार, चौधरी गल्ली, नवापूर येथील नारायणपूर रोड, प्रतापपूर, ता.नवापूर, शहादा येथील गरीबनवाज कॉलनी, संभाजीनगर येथील बाधीतांचा समावेश आहे. या सर्वांना दाखल करण्यात आले असून संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले आहे.