सारंगखेडा यात्रेतील घोडे बाजारात यंदा विक्रमी उलाढाल होणार
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: December 29, 2023 07:09 PM2023-12-29T19:09:31+5:302023-12-29T19:13:30+5:30
यावर्षी गेल्या ५० वर्षातील विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रमाकांत पाटील, नंदुरबार: सारंगखेडा येथील प्रसिद्ध घोडे बाजारात या आठवड्यात घोडे विक्रीत दोन कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. त्यामुळे यावर्षी गेल्या ५० वर्षातील विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील पाचव्या क्रमांकाचा घोडे बाजार मानल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील बाजारात यंदा सर्वाधिक म्हणजे २७०० घोड्यांची आवक झाली होती. गेल्या आठ दिवसात या बाजारात ५२८ घोड्यांची विक्री झाली असून त्यातून दोन कोटी १२ लाख ७८ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यात सर्वाधिक किमतीचा घोडा तीन लाख ५१ हजार रुपयांत विक्री झाला आहे.
तर एक लाख किमतीपेक्षा अधिक किंमत असलेल्या ५० घोड्यांची विक्री झाल्याची माहिती शहादा बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी दिली. आतापर्यंतच्या या यात्रेतील उलाढाल पाहता यंदा विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.