सुलवाडे शिवारात बिबट्याच्या ‘भक्ष्या’ची चोरट्यांनी केली ‘शिकार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:36 AM2021-09-15T04:36:11+5:302021-09-15T04:36:11+5:30
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुलवाडे शिवारात बिबट्याने दोन दिवसांपूर्वी घोड्याला शिकार केल्याची घटना घडली होती. यामुळे वनविभागाने सुलवाडा ...
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुलवाडे शिवारात बिबट्याने दोन दिवसांपूर्वी घोड्याला शिकार केल्याची घटना घडली होती. यामुळे वनविभागाने सुलवाडा शिवारात पिंजरा लावून त्यात शेळी बांधून देत सापळा रचला होता. या सापळ्यात बिबट्या अडकणार अशी अपेक्षा वनविभागाला असताना मंगळवारी पहाटे चोरट्यांनी पिंजरा उघडून शेळीच चोरुन नेल्याचा प्रकार समाेर आला आहे. यामुळे ग्रामस्थ अचंबित झाले आहेत.
सुलवाडे प्राथमिक केंद्राच्या आवारात शुक्रवारी रात्री बिबट्याने घोड्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने सोमवारी वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांच्या सूचनेनुसार आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस पिंजरा लावण्यात आला होता. याठिकाणी बिबट्याने येऊन शिकार करावी यासाठी सावज म्हणून शेळी बांधण्यात आली होती. या शेळीचा मागोवा घेत बिबट्या येणार अशी शक्यता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना होती. यामुळे पिंजरा लावल्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने याठिकाणी गस्त सुरू होती. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारासही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केल्यावर शेळी सुस्थितीत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सकाळी सात वाजता कर्मचारी पुन्हा पडताळणी करण्यासाठी गेले असता, बिबट्याला अडकवण्यासाठी लावलेला सापळा ‘जैसे थे’ होता, परंतु बांधलेली शेळी सोडवून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाकडून शेळी चोरांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चोरीच्या घटनेमुळे पुन्हा शेळी ठेवावी किंवा कसे या विचारात वनविभाग असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.