चोरट्यांचा मोर्चा आता कारच्या सायलन्सर चोरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:56+5:302021-09-27T04:32:56+5:30
नंदुरबार : महागड्या कारच्या सायलन्सरमध्ये मातीमिश्रित प्लॅटिनम धातू मिळविण्यासाठी आता चोरट्यांनी मोर्चा कारच्या सायलन्सरकडे वळविला आहे. सहा महिन्यांपूर्वी अशा ...
नंदुरबार : महागड्या कारच्या सायलन्सरमध्ये मातीमिश्रित प्लॅटिनम धातू मिळविण्यासाठी आता चोरट्यांनी मोर्चा कारच्या सायलन्सरकडे वळविला आहे. सहा महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा असे चोरटे सक्रिय झाले आहेत. शहादा येथे अशा प्रकारची एक घटना घडली असून, शहादा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. प्लॅटिनम धातू हा महाग असतो. विविध ठिकाणी त्याला मोठी मागणी असते. हा धातू महागड्या कारच्या सायलन्सरच्या आतील दोन्ही भागात लावलेला असतो. मातीमिश्रित असलेला हा धातू सायलन्सरमधून काढण्यासाठी मोठे जिकिरीचे असते. असे असले तरी चोरटे हा धातू मिळविण्यासाठी सक्रिय असतात. नंदुरबार जिल्ह्यातदेखील असे चोरटे सक्रिय झाले आहेत. शहादा येथील सुभाष रमेश चौधरी, रा. महालक्ष्मीनगर, शहादा यांनी आपली कार घराजवळ उभी केली होती. रात्रीतून चोरट्यांनी या कारचे सायलन्सर चोरून नेले. त्याची किंमत ३० हजार रुपये आहे. चोरट्यांनी कारचा दुसरा कुठलाही पार्ट चोरला नाही. केवळ सायलन्सर शिताफीने काढून चोरून नेले. सकाळी ही चोरी उघडकीस आल्यानंतर सुभाष चौधरी यांनी शहादा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक मनोज चौधरी करीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीदेखील कारचे सायलन्सर चोरीच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरी चोरी होणे बंद झाल्यानंतर आता पुन्हा असे चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.