हातोडा पुलाजवळ चोरटय़ांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:33 AM2017-10-04T11:33:22+5:302017-10-04T11:33:22+5:30
मोटारसायकल स्वारास लुटले : पोलीस चौकी उभारण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोद्याहून नंदुरबारकडे जाणा:या मोटारसायकल स्वारांची मोटारसायकल अडवून त्यांच्याकडील मोबाईल व एक हजार 700 रुपये काढून घेत त्यास चोरटय़ांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री हातोडा पुलानजीक घडली.
या व्यक्तीने आपल्या मित्रांना ही घटना सांगितल्यानंतर जमाव तेथे आला परंतु तोपावेतो हे चोरटे पसार झाले होते. दरम्यान निझर व तळोदा पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केल्याचा दावा केला असला तरी त्यानंतर लगेच पुन्हा रस्ता लुटीच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी चौकी उभारण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तळोद्याहून एक मोटारसायकलस्वार सोमवारी रात्री हातोडा पूल मार्गे नंदुरबारकडे जात होता. त्याचवेळी पुलाच्यापुढे वळणावर दबाधरून बसलेल्या चोरटय़ांनी त्याची मोटारसायकल रस्त्यात अडवून त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून खिशातील एक हजार 700 रुपये देखील बळजबरीने काढून घेतले. एवढय़ावरच ते थांबले नाही. या युवकाने प्रतिकार केल्यावर त्यास चांगलीच मारहाण केली. घाबलेल्या या युवकांनी आपल्यावरील प्रसंगाची माहिती गावातील मित्रांना सांगितल्यावर 25 ते 30 तरूण मोटारसायकलीने येवून घटनास्थळी दाखल झाले. तो पावेतो चोरटे तेथून पसार झाले होते. प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हातोडा पुलामुळे तळोदा ते नंदुरबार हे अंतर कमी झाल्याने साहजिकच विविध कामांसाठी नंदुरबारकडे जाणा:यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी हातोडा रस्त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली. मात्र गेल्या महिन्यात रस्ता लुटीच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे. निझर ते तळोदा पोलिसांनी गस्त घालण्याचा दावा केला असला तरी त्यानंतर लगेच रस्ता लुटीची घटना घडल्याने एक प्रकारे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या ठिकाणी कायमची पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे