तिसऱ्या दिवशी एसडीआरएफच्या पथकाला सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:15+5:302021-09-16T04:38:15+5:30
१३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीच्या जवळ तापी नदीच्या किनारी प्रकाशा येथील ...
१३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीच्या जवळ तापी नदीच्या किनारी प्रकाशा येथील रवींद्र भीमा सामुद्रे हे वडिलांचे उत्तरकार्य व मुंडन विधी करण्यासाठी नातेवाइकांसह आले होते.
मुंडन झाल्यावर तापी नदीच्या किनारी पाण्यात अंघोळीसाठी रवींद्र सामुद्रे यांची दोन्ही मुले राज सामुद्रे व गौतम सामुद्रे हे अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता, मोठा मुलगा गौतमचा अचानक तोल जाऊन पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या जवळ असलेला त्याचा लहान भाऊ राज सामुद्रे याने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोही बुडून वाहून गेला. तेथे असलेल्या मच्छिमारांनी पाण्यात उडी घेऊन गौतम सामुद्रे यास नदीच्या पात्रातून बाहेर काढले होते व त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविले होते, तर लहान राज सामुद्रे हा पाण्यात बुडून वाहून गेला होता. तो दोन दिवस शोध घेऊनही मिळून आला नव्हता.
तिसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एसडीआरएफ धुळेची टीम आली. त्यांनी रबरी बोट तयार केली व तापी नदीच्या पात्रात शोध घेतला असता त्यांना रफिक खाटीक यांच्या खडी क्रशरजवळील तापी नदीच्या पात्रात एक मृतदेत तरंगताना दिसून आले. त्यांनी तो मृतदेह बाहेर काठावर आणला असता त्याची ओळख पटली. त्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. याप्रसंगी नातलग व समाज बांधवांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली होती.
शवविच्छेदनला उशीर झाल्याने संताप
साडेआठ ते नऊच्या दरम्यान मृतदेह तापी काठावर आणला गेला. मात्र, शवविच्छेदनासाठी दुपारी दीड वाजेपर्यंत नातेवाइकांना वाट पाहावी लागली. याप्रसंगी नातेवाइकांनी संतापदेखील व्यक्त केला. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना आपल्या गावाहून यायला उशीर झाला. जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शविच्छेदनासाठी स्विपर कर्मचारी देखील नातेवाइकांनीच म्हसावद येथून आणला. प्रकाशा आरोग्य केंद्रात स्विपरचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे.
पुढील तपास प्रकाशा पोलीस क्षेत्राचे जमादार सुनील पाडवी, रामा वळवी, विकास शिरसाठ, अजित नागलोद हे करीत आहेत.