तीन कोटी खर्चाचा बोगदा रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:09 AM2017-09-04T11:09:22+5:302017-09-04T11:09:32+5:30
नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा : रहदारीचा ताण कायम, नागरिकही हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या दुस:या बोगद्याचे काम रखडले असून यामुळे रहदारीचा प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, दुहेरीकरण कामाच्या वेळी या बोगद्याचे काम होणे अपेक्षीत असतांना त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी 96 लाख रुपये मंजुर आहेत.
रेल्वे मार्गामुळे नंदुरबारचे दोन भागात विभाजन झाले आहे. या दोन्ही भागात अनेक कार्यालये, रहिवास वस्ती, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे लाखो लोकांची ये-जा सुरू असते. परिणामी उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण वाढतो. शिवाय नळवा रस्त्यावरील बोगद्यात देखील वाहतुकीची खोळंबा होतो. ही बाब लक्षात घेता नळवा रस्त्यावर सध्या असलेल्या बोगद्याच्याच ठिकाणी आणखी एक नवीन बोगदा तयार करावा अशी मागणी करण्यात येत होती. रेल्वेने देखील त्याला मंजुरी दिली होती. परंतु निधीची बाब ही राज्य सरकारच्या अख्त्यारीतील बाब असल्यामुळे ती अडचण येत होती. दीड वर्षापूर्वी निधीचीही अडचण सोडविण्यात आली, परंतु दुस:या बोगद्याच्या कामाला काही सुरूवात झाली नसल्याचे चित्र आजही कायम आहे.
नळवा रस्त्याचे आता बोगद्यापासून ते थेट नळवा हद्दीर्प्यत दुपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचा लूक बदलणार आहे. परंतु रेल्वे बोगद्याजवळच मोठी समस्या निर्माण होणार आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, एलईडी पथदिवे लावण्यात येत आहेत. शिवाय दोन्ही बाजुला भुमिगत गटार देखील बनविण्यात येणार आहे. या रस्त्यावरून कुकरमुंडा, वेळदा यासह पश्चिम पट्टयातील अनेक गावांना जाणे सोयीचे ठरते.
किरकोळ अतिक्रमणे निघतील
हा बोगदा तयार करण्यासाठी किरकोळ अतिक्रमण तोडावे लागणार आहे. ती जबाबदारी अर्थात पालिकेची राहणार आहे. पालिका रेल्वेला अर्थात काम करून देणा:या संस्थेला ही सोय करून देणार आहे. पक्की नसली तरी किरकोळ स्वरूपातील एक किंवा दोन अतिक्रमण काढावे लागणार आहे.
पर्यायी मार्ग
सध्या उड्डाणपुलावरील वाहतुकीची रेलचेल पहाता नळवा रस्त्याला पर्याय म्हणून अनेकांनी स्विकारला आहे. आता दुसरा बोगदाही झाल्यावर या मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे हाटदरवाजा ते बोगद्यार्पयतच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणेही आवश्यक राहणार आहे.
नवीन पर्यायी बोगदा हा सध्या असलेल्या बोगद्याला लागूनच राहणार आहे. तेंवढय़ाच लांबी रुंदीचा असलेला हा बोगदा सध्या असलेल्या बोगद्याच्या पश्चिमेला अर्थात डाव्या बाजूस राहणार आहे. हा बोगदा काँक्रीटीकरणातून तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याला जोडणारा दोन्ही बाजूकडील रस्ता देखील या खर्चाअंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या बोगद्यातून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी मार्ग राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा इतरवेळी रहदारी खोळंबणार नाही. छोटी चारचाकी वाहने देखील बिनधिक्कत या बोगद्यातून ये-जा करू शकणार आहेत.