तळोद्यात तीन दिवसांची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:53 PM2020-04-23T12:53:04+5:302020-04-23T12:53:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेजारच्या शहादा व अक्कलकुवा तालुक्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय प्रशासनाने बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शेजारच्या शहादा व अक्कलकुवा तालुक्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय प्रशासनाने बुधवारी दुपार ते शुक्रवार मध्यरात्री यादरम्यान तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे़ केवळी औषधी विक्रेते, दवाखाने आणि शासकीय गोदामे यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे़
दोन दिवसांपूर्वीच शासनाने लॉकडाऊनची स्थिती शिथिल केली होती़ त्यामुळे तळोदावासियांना दिलासा मिळाला होता़ मात्र आता पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन रहावे लागणार आहे़ तळोदा तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णही आढळून आलेला नाही़ परंतू मंगळवारी शेजारील शहादा व अक्कलकुवा तालुक्यात तीन रुग्ण आढळून आल्यानंतर तळोदावासियांची चिंता वाढली आहे़ प्रशासनाकडूनही प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना अवलंबल्या जात आहे़ खबरदारी म्हणून उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून संचारबंदी सुरु करण्यात आली आहे़ संचारबंदीतून दवाखाने, मेडीकल, गोदामे यांना सूट देण्यात आली आहे़ बुधवारी दुपारी शहरात प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी भेटी देत पाहणी केली़
दरम्यान अक्कलकुवा येथील पॉझिटिव्ह महिला रुग्ण शहरातील एका शाळेत कार्यरत असल्याची माहिती आहे़ यांतर्गत त्यांच्या उपस्थितीत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते़ यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने शहरात सर्वेक्षण हाती घेतले आहे़ यांतर्गत बागवान गल्लीत सर्वेक्षण करण्यात आले़ महिला रुग्णाने भेटी दिलेल्या शाळेसह आरोग्य पथकाने बागवान गल्ली, एकतानगर, नुराणी चौकातील नागरिकांच्या घरी जावून आरोग्य पथकाने सर्वेक्षण करुन तपासणी केली़ एकूण ४७ कुटूंबांची तपासणी करण्यात आली असून यातील कोणालाही सर्दी,खोकला, ताप किंवा इतर तत्सम लक्षणे दिसून आलेली नाहीत़ आरोग्य विभाग या भागावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे़
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी बसस्थानकात शहरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांची सोय करण्यात आली होती़ परंतू येथे अंकुश ठेवण्यात प्रशासनाला यश मात्र आले नव्हते़ या पार्श्वभूमीवर तळोदा तालुका कृषी विभागाकडून घरपोच भाजीपाला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी अष्टविनायक शेतकरी गटांतर्गत घरपोच भाजीपाला देण्यावर भर देण्यात येणार आहे़ शहरातील विविध वसाहतींमध्ये घरपोच भाजीपाला दिला जात आहे़ या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहेत़