नंदुरबारात कुख्यात तीन दरोडेखोर केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:06 AM2019-03-25T11:06:47+5:302019-03-25T11:06:52+5:30

एलसीबीची कारवाई : टोळीतील सहापैकी तीनजण अंधारात पसार, चार जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार

Three dreaded robbers have been killed in Nandurbar | नंदुरबारात कुख्यात तीन दरोडेखोर केले जेरबंद

नंदुरबारात कुख्यात तीन दरोडेखोर केले जेरबंद

Next

नंदुरबार : दरोडेखोरांच्या कुख्यात टोळतील तिघांना नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून घातक हत्यार जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मोठ्या दरोड्याच्या तयारीत तिघे होते. यापैकी दोघांवर नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात आठ ते नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. दरम्यान, कारवाईत तीनजण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.
गोट्या बंड्या काळे (२४) रा.रासेन, ता.कर्जत, जिल्हा अहमदनगर, सायराफ उर्फ साईराम जाना काळे (३५) व विक्की पावशा चव्हाण रा.शेकटा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मिरचीपूड, सूती दोर, १४ इंची लांब धारदार सुरा, ४४ इंच लांब लोखंडी टॉमी, करवत, लोखंडी गज आदी जप्त करण्यात आले.
एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी आणि बंदोबस्ताचा ताण असतांना दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना दुहेरी कसरत करावी लागत आहे. कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांना पकडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले उपस्थित होते.
टीप मिळताच कारवाई...
पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, शहरात शनिवार, २३ रोजी शिवजयंतीच्या मिरणुका सुरू असतांना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना शहरातील भाऊ पेट्रोलपंप मागे पाच ते सहाजण दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक त्या ठिकाणी पोहचले. या परिसरात बारकाईने शोध घेतला असता राजेंद्र फार्म हाऊसच्या परिसरात एका बंद बंगल्याच्या आडोश्याला काहीजण दबा धरून बसले होते. किशोर नवले व पथकाने या भागात सापळा लावून सहा पैकी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांची माहिती घेतली असता त्यांच्यावर पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चार जिल्ह्यांमध्ये शोध...
अनेक दिवसांपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर पोलिसांची झोप उडविणाऱ्या दरोडेखोरांच्या या टोळीच्या मागावर या जिल्ह्यांचे पोलीस होते. राज्यभर जाळे सक्रीय असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खोटे नावे, गाव, वय सांगून गुन्ह्याची लवकर कबुली न देणे हा या टोळीचा खाक्या आहे. परंतु नंदुरबार पोलिसांनी रात्रीतूनच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी शोधून काढली. अधीक तपासासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील , अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार विकास पाटील, दिपक गोरे, प्रदीप राजपूत, योगेश सोनवणे, रवींद्र पाडवी, विनोद जाधव, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, भटू धनगर, संदीप लांडगे, महेंद्र सोनवणे, राकेश मोरे, किरण मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, सतिष घुले यांनी केली. पथकाला रोख बक्षीस देखील जाहीर केले.

Web Title: Three dreaded robbers have been killed in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.