शांतीवनात एकाच रात्रीत तीन घरे फुटल्याने ‘अशांती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:00 PM2020-01-29T13:00:40+5:302020-01-29T13:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरुड रस्त्यावरील शांतीवन नगरातील कुटूंबाला खोलीत कोंडून तिघा चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शिरुड रस्त्यावरील शांतीवन नगरातील कुटूंबाला खोलीत कोंडून तिघा चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली़ घटनेमुळे खळबळ उडाली असून येथील रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे़
शहादा ते शिरुड रस्त्यावर शांतीवन नगर ही नवीन वसाहत आहे़ याठिकाणी उत्तम भिमसिंग पाटील यांच्यासह त्यांचे भाडेकरु विठ्ठल पाटील हे राहतात़ रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उत्तम पाटील यांच्या घरात प्रवेश करुन घरातील इतर खोल्यांना कडी लावत कपाट असलेल्या खोलीत प्रवेश करत चोरी केली होती़ चोरट्यांनी कपाट फोडून १ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केला़ उत्तम पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे भाडेकरु अनिल पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता़ अनिल पाटील हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते़ चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सुमारे ५७ हजार रुपयांचे दागिने आणि दागिने व रोख रक्कम चोरी करुन नेले़ चोरट्यांनी येथून पळ काढत भिमसिंग विजयसिंग गिरोस यांचे बंद घर फोडून तेथूनही २८ हजार रुपये रोख लांबवले़ एकाच रात्री तीन घरे फुटल्याची माहिती रविवारी सकाळी समोर आल्यानंतर पोलीसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते़ चोरटे चोरी करुन सहजपणे या भागातून पसार झाल्याची माहिती समोर आली असून रविवारी ठसे तज्ञ, श्वानपथकाला बोलावून तपासणी करण्यात आली होती़ परंतू अपेक्षित यश मिळालेले नसल्याची माहिती आहे़
४अनिल पाटील व भिमसिंग गिरासे या दोघांच्या घरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता़ तर उत्तम पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोर आत आले होते़ चोरट्यांचा आवाज आल्यानंतर उत्तम पाटील यांनी खोलीच्या दरवाजाकडे धाव घेतली असता बाहेरुन कडी लावल्याने त्यांना बाहेर पडता आले नव्हते़ त्यांनी पत्नी आणि मुलांना उठवल्यानंतर आरडाओरड सुरु केली होती़ दरम्यान तीन ते चार जण पळून जाताना त्यांना दिसून आले़ यापूर्वीही शांतीवन परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत़ दोन ते तीन ठिकाणी घरफोडी केल्यानंतर चोरटे पुन्हा या भागात सक्रीय झाल्याने चिंता वाढल्या आहेत़ विशेष म्हणजे पोलीसांकडून या भागात सातत्याने गस्त सुरु आहे़
शांतीवन नगर हे शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे़ शुकशुकाट असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी येथे घरफोडी केल्याचा अंदाज आहे़ नागरिकांकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत बैठका झाल्या आहेत़ सीसीटीव्हीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे़
शहादा शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत़ खास करुन दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत़ पोलीस प्रशासनाकडून केवळ गस्तीची कारवाई होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़