घर जाळल्याच्या आरोपाखाली तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:16 PM2019-03-15T21:16:33+5:302019-03-15T21:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील तिघांना शहादा न्यायालयाने पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथे 8 एप्रिल 2014 रोजी रात्री ही घटना घडली होती.
उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथील दमणीबाई देवला पाडवी ही महिला गावात महिला बचत गटाचे सचिव तसेच महिला बचतगट संचलित स्वस्त धान्य दुकान चालवीत होत्या. गावातीलच शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांनी दमणीबाई व आहटीबाई यांना शिविगाळ करून मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दिली. त्याचा राग शिवाजी पाडवी यांना आला होता. त्यातून त्यांनी दमणीबाई यांना ठार मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिली होती.
8 एप्रिल 2014 रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दमणीबाई व परिवार झोपले असतांना अचानक त्यांना घर जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी जीव जीव वाचविण्यासाठी बाहेर धाव घेतली. त्यावेळी शिवाजी पाडवी व इतर दोनजण पळून जातांना त्यांनी पाहिले. आग विझविण्यासाठी काहीही साधन नसल्याने सर्व घर जळून खाक झाले. घरात 60 हजार रुपये रोख, 14 क्विंटल धान्य, म्हैस, उसनवारीचे 50 हजार रोख, संसारोपयोगी सामान असा एकुण पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते.
याबाबत मोलगी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ पालवे यांनी तपास करून दोषारोपपत्र शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.
न्या. पी.बी.नायकवाड यांच्या कोर्टात हा खटला चालला. साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या.नायकवाड यांनी शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी सर्व रा.उंबराणीपाडा यांना पाच वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 429 मध्ये तीन वर्ष कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.विनोद गोसावी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नासिरखान पठाण होते.