राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या इच्छेचा वाजला नगाडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:27+5:302021-09-24T04:36:27+5:30
नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक ...
नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक तर १९ क्रमांकाच्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात आले होते. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे कॉंग्रेसच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी या निवडून आल्या होत्या. पक्षीय बलाबल पहाता पालिकेत कॉंग्रेस अर्थात रघुवंशी गटाचे २४ नगरसेवक, भाजपचे ११ तर शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.
अशी असू शकते पालिकेतील स्थिती
नवीन प्रभाग पद्धतीमुळे शहरातील प्रभाग रचना पूर्णपणे बदलणार आहे. एकूण २१ प्रभाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन नगरसेवक वाढतील, असा अंदाज आहे. प्रभाग रचना ही पूर्वीप्रमाणेच शहराच्या वाघोदा-पातोंडा शिवाराकडून सुरू होऊन शेवट भोणे, चौपाळे शिवाराकडे होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या या बाबींची रचना निवडणुकीच्या चार महिने आधी होणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारीला व चाचपणीला वर्षभर आधीपासूनच सुरुवात केली आहे.
दोघांना द्यावे लागणार मत
एका मतदाराला प्रभागात दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्थात दोन जणांना निवडून द्यायचे असल्याने दोन उमेदवारांना मते द्यावी लागतील. गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे प्रभागातील दोन किंवा तीन उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार असे तीन किंवा चार ठिकाणी मतदान करावे लागले होते. यामुळे मतदान यंत्रावर यावेळी उमेदवारांची गर्दी कमी राहणार आहे. गेल्या वेळी काही ठिकाणी दोन मतदान यंत्र लावावे लागले होते.
शहर विकासाचे काय?
प्रभाग पद्धतीमुळे शहर विकासाचे काय? असा प्रश्न काहींकडून उपस्थित केला जात आहे. कारण थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधीलकी ही सर्वच शहराची असते. त्यामुळे सर्वच भागात त्यांना सारखा विकास व कामे करावी लागतात. तर प्रभाग पद्धतीत एका प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्ष होत असतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात कामांबाबत दुजाभाव केला जात असतो, असा आरोप नेहमीच होत असतेा. प्रभाग पद्धतीत त्याचा तोटा राहण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
प्रभाग पद्धतीमुळे सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्यास संधी मिळते. अशा वेळी गरीब व सामान्य उमेदवाराचे भवितव्य उजाडते. त्यातून त्याला न्याय मिळतो. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीत संपूर्ण शहराशी अटॅचमेंट राहून थेट जनतेशी संपर्क येतो. अर्थात शासन निर्णयाचे स्वागत असून, त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करणार आहोत.
-चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते.