नवमीच्या दानातून श्रीराम प्रकटले दारी अन् प्रकाशाचा सुखदेव घेणार शिक्षणात भरारी
By भूषण.विजय.रामराजे | Published: March 31, 2023 05:37 PM2023-03-31T17:37:26+5:302023-03-31T17:37:49+5:30
शेकडोंच्या संख्येने भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
भूषण रामराजे, नंदुरबार: दीन दुबळ्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वरभक्ती असे संत गाडगेबाबा म्हणत, त्यांचे हे वाक्य प्रकाशा ता. शहादा येथील राममंदिराच्या पुजारींनी शब्दश: सार्थ ठरवत रामनवमीच्या दिवशी आलेले संपूर्ण दान गावातीलच सहावीच्या गरजू विद्यार्थ्यांला दिले आहे. सुखदेव असे या चिमुरड्याचे नाव असून तो अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दक्षिण काशी प्रकाशा ता. शहादा येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरी झाली. यावेळी शेकडोंच्या संख्येने भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
प्रसंगी भाविकांकडून स्वेच्छेने काही दानदक्षिणा मंदिराचे पुजारी प्रशांत उपासनी यांना करण्यात येत होते. दिवसभरात जमा झालेली दानाची रक्कम गावातील शाळेत सहावीच्या वर्गात शिकणारा सुखदेव अशोक ठाकरे याला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.दिवसभरात शेकडोंच्या संख्येने भाविकांनी याठिकाणी दर्शन घेतल्याने दानाच्या स्वरुपात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. सायंकाळी जमा झालेली रक्कम पुजारी प्रशांत बंडू उपासणी यांनी सुखदेव अशोक ठाकरे त्याची आई आणि आजोबा यांच्या हातात दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किशोर मुरार चौधरी, हितेश वाणी, सचिन सोनार, राजेंद्र पाटील, रामबाबा पाटील, संदीप भोई,धीरज वाणी,दिलीप वाणी उपस्थित होते.