यंदा इच्छूकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:45 PM2019-07-02T12:45:22+5:302019-07-02T12:45:59+5:30
वसंत मराठे। लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसभेतील विजयाच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी भाजपतील दोघा-तिघांनी शहादा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच दावा केल्यामुळे ...
वसंत मराठे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : लोकसभेतील विजयाच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी भाजपतील दोघा-तिघांनी शहादा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच दावा केल्यामुळे इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी निश्चितच स्पर्धा रंगणार आहे. तसेच आघाडीतही हा मतदारसंघ कोणाकडे जातो याविषयी उत्सुकता लागली आहे. सध्या भाजपचे उदेसिंग पाडवी मतदारसंघाचे नेतृत्व करीत असून तेही कामाला लागले आहेत.
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ आदिवासी गटासाठी राखीव आहे. दोन पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी हा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी होता. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन तळोदा तालुक्याचा समावेश करून शहादा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघ युतीकडून भाजपच्या वाटय़ाला असून आघाडीतर्फे काँग्रेसच्या वाटय़ाला आला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी करीत होते. मात्र गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे या तिरंगी लढतीचा फायदा आमदार उदेसिंग पाडवींना होऊन ते साधारण 750 मतांनी विजयी झाले होते. यंदाही युती झाल्यास मतदारसंघ भाजपकडे राहील तर आघाडी झाल्यास काँग्रेसला सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावेळी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी, काँग्रेसतर्फे अॅड.पद्माकर वळवी व राष्ट्रवादीतर्फे राजेंद्रकुमार गावीत यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. निवडणूकही अत्यंत चुरशीची झाली होती. शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उतरवला होता. यंदा युती व आघाडी होण्याचे स्पष्ट चित्र आहे. तरीही आघाडीतून राष्ट्रवादीने या जागेसाठी दावा केल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी भाजपकडून पुन्हा आमदार उदेसिंग पाडवी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यादृष्टीने ते कामालाही लागले आहेत. मात्र त्यांचे पुत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी व अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रुपसिंग पाडवी या दोघांच्या उमेदवारीसाठी संस्था व पदाधिका:यांनी दावा केल्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये चर्चेला उधाण आले.
भाजप
विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी, राजेश पाडवी व रुपसिंग पाडवी हे इच्छूक आहेत. इच्छूकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी व कॉँग्रेस
काँग्रेसकडून माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी हे इच्छूक आहेत.
राष्ट्रवादीकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत हे इच्छूक आहेत.
शिवसेनेतर्फे अद्याप इच्छूकांचे नाव पुढे आलेले नाही तर वंचीत आघाडी आणि डाव्या आघाडीतर्फे देखील काहीजण उमेदवारीसाठी इच्छूक राहणार असल्याचे चित्र आहे.
आघाडी व युती
आघाडी व युतीचा निर्णय झाल्यास येथे मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोरीलाही येथे वाव राहणार आहे. त्यामुळे आघाडी व युतीचा निर्णय काय होतो यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.