उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांवर मानधन थकल्याने उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:35 AM2021-07-14T04:35:59+5:302021-07-14T04:35:59+5:30
नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...
नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, गटप्रेरक व बीटीपीच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन, समस्या सोडविण्याची मागणी भारतीय ट्रायबल पार्टीने केली आहे.
जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हा परिषदेंतर्गत इतर तालुक्यांतील उमेदच्या गटप्रेरिकांना मानधन मिळालेले आहे, परंतु नवापूर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे थकीत मानधन जिल्हा परिषदेच्या गचाळ कारभारामुळे मिळालेले नाही. थकीत मानधनामुळे गटप्रेरिकांची कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उपासमार होत आहे. अनेक गटप्रेरिका विधवा व काही परितक्त्या महिला असून, काही गटप्रेरिकांचे चार वर्षांपासूनचे तर काहींचे कामावर लागल्यापासूनचे मानधन मिळालेले नाही, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्याच्या वेळी तालुकाध्यक्ष राहुल गावीत, विजय ठाकरे, किरण गावीत, महादू गावीत, आनंद गावीत उपस्थित होते.
अर्जफाटे करूनही उपयोग नाही
गटप्रेरिकांना मानधन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला अनेक वेळा अर्जफाटे करून अधिकाऱ्यांशी आजपावेतो अनेक वेळा चर्चा केली. चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली. गटप्रेरिकांना थकीत मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.
जमावबंदीमुळे आंदोलन नाही
जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्यामुळे व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मानधन मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन, आमरण उपोषण करू शकत नसल्यामुळे, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ५० महिला गटप्रेरिका व पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील भगवान बिरसामुंडा दालन किंवा रंगावली सभागृहात १९ रोजी किंवा प्रशासन वेळ देईल, त्या वेळेनुसार कोरोना नियमावलीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून शिष्टमंडळाला लेखी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.