ंआदिवासी आश्रमशाळांसाठी आता टोल फ्री रुग्णवाहिका
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: October 2, 2018 11:54 AM2018-10-02T11:54:33+5:302018-10-02T11:55:11+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्यातील 108 क्रमांकांच्या रुग्णवाहिकेच्या धर्तीवर ही सुविधा राहणार आहे. राज्यातील 14 प्रकल्पातील 301 आश्रमशाळा व आठ एकलव्य निवासी शाळांना याचा लाभ मिळणार आहे.
नंदुरबार व तळोदा प्रकल्पासाठी 13 रुग्णवाहिका मंजुर करण्यात आल्या आहेत. राज्यातील विशेषत: दुर्गम भागातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याच्या विविध कारणांनी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आदिवासी समाजात मोठय़ा प्रमाणावर रोष आहे. ही बाब लक्षात घेता आता आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना लागलीच वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी 108 रुग्णवाहिका सेवेची जोड मिळणार आहे. राज्यातील कळवण, तळोदा, धुळे, यावल, नंदुरबार, राजूर, किनवट, पांढरकवडा, धारणी, कळमनुरी, नागपूर, गढचिरोली, अहेरी, भामरागड या 14 प्रकल्पातील 301 आश्रमशाळा आणि आठ एकलव्य निवासी इंग्रजी शाळांसाठी ही सुविधा राहणार आहे.
अशी राहील सुविधा
चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका राहणार आहे. या शाळांच्या मध्यवर्ती भागात जी शाळा असेल त्या शाळेत रुग्णवाहिका थांबण्याची सोय राहणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका, आरोग्य सेवक, चालक आदी स्टाफ राहणार असून आवश्यक ती वैद्यकीय सेवा त्यात उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी त्या त्या आश्रम शाळेत बसण्याची व निवासाची, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
टोल फ्री क्रमांक
सध्या सुरू असलेल्या 108 क्रमांकावरूनच या रुग्णवाहिकेशी संपर्क साधता येणार आहे. संपर्क साधल्यानंतर 15 ते 35 मिनिटात रुग्णवाहिका संबधीत आश्रम शाळेत पोहचेल असे नियोजन असेल. अर्थात मध्यवर्ती ठिकाणी ती उभी करण्याची सोय त्यादृष्टीने करण्यात येणार आहे.
अत्याधुनिक रुग्णवाहिका
आदिवासी विकास विभाग व भारत विकास ग्रृप यांच्या संयुक्त माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी अत्याधुनिक व सर्व आरोग्य सेवांनी परिपुर्ण असलेल्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. लवकरच संबधीत प्रकल्प कार्यालयांना त्या पोहचविल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात 13 रुग्णवाहिका
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व तळोदा प्रकल्पासाठी एकुण 13 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार प्रकल्पासाठी सहा तर तळोदा प्रकल्पासाठी सात रुग्णवाहिका, तेवढे डॉक्टर, परिचारिक व आरोग्य सेवक आणि चालक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत इंग्रजी माध्यम शाळा नंदुरबार, नावली आश्रम शाळा, देवमोगरा आश्रमशाळा, रामपूर आश्रमशाळा, तोरणमाळ आश्रम शाळा येथे रुग्णवाहिका थांबा राहणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आश्रम शाळांमध्ये सर्पदंश, सिकलसेल यासह इतर कारणांनी विद्यार्थी मृत्यूचे प्रमाण अधीक आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक विद्याथ्र्याचे जीव गेले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आतार्पयत तीन विद्याथ्र्याना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. ही बाब लक्षात घेता या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील आश्रम शाळांमध्ये मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम असतो. अशा वेळी पर्यायी व्यवस्था काय राहणार याबाबत मात्र, उपाय सुचविण्यात आलेले नाही. भारतीय विकास ग्रृपचे या सर्व उपक्रमात सहकार्य मिळणार आहे. योजना आदिवासी विकास विभाग राबविणार आहे.