तापी जन्मोत्सवानिमित्त वस्त्रार्पणाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:09 PM2019-07-08T12:09:42+5:302019-07-08T12:09:48+5:30
नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : आषाढ शुद्ध सप्तमीनिमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव ...
नरेंद्र गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : आषाढ शुद्ध सप्तमीनिमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव नदीला साडी अर्पण करण्यात येऊन साजरा करण्यात येतो़ शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत खान्देशासह गुजरात राज्यातील शेकडो भाविक सहभागी होऊन पूजन करतात़
प्रकाशा ता़ शहादा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आह़े संगमरवरी दगडातील देवीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी होत असली तरी आषाढ महिन्यातील सप्तमीला येणारा तापीनदीचा जन्मोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो़
तापी नदीचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा नेमकी कधी व कोणी सुरु केली, याबाबत ठोस असे पुरावे नसले तरी प्राचीन काळापासून नदीचे पूजन करण्याची परंपरा असल्याचे सांगण्यात येत़े दरम्यानच्या काळात तापी नदी काठावरील गावांमध्ये राहणा:या महिला देवी तापीच्या नावाने तीन दिवसांचा उपवास करतात़ पंचमीपासून सुरु होणारे हे उपवास सप्तमीला सोडवले जातात़ उपवास सोडण्यापूर्वी त्यांच्याकडून तापी महात्म्याचे वाचन करतात़
शेवटचा अध्याय सप्तमीला तापी नदीला साडी अर्पण करण्यापूर्वी वाचून पूजन करण्यात येत़े नदीवर होणा:या या पूजनात तापीला सप्तश्रृंगार अर्पण करण्यात येऊन विधीवत आरतीपूजन करण्यात येत़े यावेळी काठावर असंख्य महिला उपस्थित राहून उपवास सोडवतात़ भाविकांसाठी विशेष पर्वणी असलेल्या या जन्मोत्सवानिमित्त जोडप्यांच्या हस्ते पूजन, अन्नदान यासह होमहवनही करण्यात येत़े नवस फेडणारे याठिकाणी हजेरी लावतात़ प्रकाशा येथील रहिवासी असलेल्या हिराबाई बन्सी पाटील यांच्याकडून अनेक वर्षापासून तापी पूजन करुन महात्म्य वाचले जात़े
सालाबादाप्रमाणे तापी नदीत स्नान करुन जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी यंदाही शेकडो भाविक येणार असल्याने त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आह़े 8 जुलै रोजी संगमेश्वर मंदिराकडून उत्सवाला प्रारंभ होणार आह़े सकाळी आठ वाजता तोताराम मंदिरावरुन वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आह़े या शोभायात्रेत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहे. याठिकाणी आरती पूजन करण्यात आल्यानंतर तापी मातेला साडीचोळी अर्पण करण्याच्या विधीस प्रारंभ होणार आह़े
जन्मोत्सवामुळे केदारेश्वर मंदिर परिसराला यात्रोत्सवाचे स्वरुप येत़े येथे असलेली तापी नदीची मूर्ती अन्य कोठेही नसल्याचे सांगण्यात येत़े चार भुजा, डोक्यावर मुकूट, एका हातात शंकराची पिंड, दुस:या हातात डमरु अशी ही मूर्ती पूर्वाभिुमख आह़े तापी नदीवरील सारंगखेडा ता़ शहादा येथील बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्याने येथील पात्रात जलस्तर वाढले आह़े यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आह़े