शुभारंभालाच वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: January 9, 2017 11:08 PM2017-01-09T23:08:25+5:302017-01-09T23:08:25+5:30
वाहतूक सप्ताह : रॅली दरम्यानही मोकाट गुरांचा उच्छाद
नंदुरबार : वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे एकीकडे उद्घाटन होत असताना दुसरीकडे त्याचवेळी शहरातील मुख्य गजबजलेल्या नेहरू चौक ते हाटदरवाजा परिसरातील रहदारी तब्बल तासभर खोळंबली होती. शिवाय रॅलीदरम्यान विद्याथ्र्याना मोकाट गुरांचादेखील सामना करावा लागल्याचे चित्र होते.
उपप्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेतर्फे सोमवारी वाहतूक सुरक्षा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. सकाळी त्यानिमित्त कचेरी मैदानापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. एकीकडे रॅलीचा शुभारंभ होत असतांना दुसरीकडे याच मुख्य रस्त्याने अर्थात नेहरू पुतळा ते हाटदरवाजा परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
शहरातून लक्झरी वाहनांना प्रवेश बंदी असताना सर्रास या रस्त्याने लक्झरी वाहने जात असतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते.
आजही तेच झाले. लक्झरी वाहन आणि आयशर ट्रक समोरासमोर आल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. थेट बसस्थानक ते नेहरू पुतळा, हाटदरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळेर्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले.
दुसरीकडे जनजागृतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतदेखील मोकाट गुरांनी उच्छाद मांडला. त्यामुळे विद्याथ्र्याना जीव मुठीत घेऊन या रॅलीत सहभागी व्हावे लागले.
मोकाट गुरांमुळे अनेकवेळा अपघातदेखील झाले आहेत. परंतु त्याकडेदेखील पालिका आणि वाहतूक शाखेने दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.