नंदुरबार शहरातील रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे रहदारीला अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:44 PM2018-03-11T12:44:04+5:302018-03-11T12:44:04+5:30
पर्यायी जागेची मागणी कायम : अधिकृत विक्रेत्यांना जागा मिळावी
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : रस्त्यावरील रहदारीस अडथळा ठरणारे व फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. या व्यावसायिकांना पर्यायी जागा कुठे देणार हा पालिकेपुढे मोठा प्रश्न आहे. सात वर्षापूर्वी पालिकेने दोन पर्यायी जागा सुचविल्या होत्या. परंतू त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न जैसे थे आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि चौकांमध्ये फेरीवाल्यांची समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. अनेक भागात तर दुचाकी काढणे देखील मुश्कील होते. विशेष म्हणजे मंगळ बाजारातील सरदार सोप फॅक्टरीपासून तर थेट महाले हॉटेलर्पयत रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते हातगाडी लावून उभे असतात. शिवाय रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे विक्री करणारे देखील मोठय़ा प्रमाणावर आहे. या ठिकाणी एवढे अतिक्रमण वाढले आहे की, चालणे देखील मुश्किल होते. परिणामी गर्दीच्या वेळी बाजारासाठी येणा:या महिला, मुलींना धक्काबुकीचे प्रकार हमखास घडतात.
याशिवाय या रस्त्यावर दोन्ही बाजून व्यापा:यांनी लाखो रुपये खर्च करून गाळे घेतले आहेत. या गाळ्यांमधील दुकानांमध्ये जाण्यासाठी देखील वाट काढत जावे लागते. परिणामी अशा व्यवसायिकांच्या व्यवसावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अशा व्यापा:यांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याचा सूर आहे. याउलट रस्त्यावर बसणारे व हातगाडीवरील विक्रेत्यांच्या दादागिरीस अशा दुकानदारांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
कारवाईनंतर जैसे थे होते
पालिकेने आतार्पयत जेवढे व जितक्या वेळा अतिक्रमण काढले त्यानंतर दोन, चार दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. अर्थात फेरीवाल्यांना इतर ठिकाणी देखील पर्यायी जागा दिली गेली नसल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची आणि उपासमारीची वेळ येते. त्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी असे व्यवसायिक व्यवसाय सुरू करतात हे नित्याचे आहे.
पर्यायी जागेचे काय?
फेरीवाल्यांना पर्यायी जागेचे काय? हा प्रश्न कायम राहतो. अतिक्रमण हटवितांना या बाबींचाही विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.शहराला लागून पर्यायी जागा नाही. नेहरू चौक परिसरात तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तात्पुरती जागा आहे. तेथे क्रिडा संकुलाचे काम सुरू झाल्यावर त्यांना तेथून हटविले जाणार आहे. त्यामुळे या परिसरात उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेवर अशा व्यवसायिकांना जागा देता येऊ शकते. दुसरी पर्यायी जागा नवीन बसस्थानकासमोर व वीज वितरण कार्यालयाच्या बाजुला असलेली जागा पर्यायी ठरू शकते. त्याबाबतही विचार व्हावा अशी अपेक्षा फेरीवाल्यांकडून करण्यात येत आहे.
दुकानदारांचेही अतिक्रमण
अनेक दुकानदार आपल्या दुकानाचे सामान दुकानाबाहेर भर रस्त्यावर ठेवत असतात. त्यामुळे देखील रहदारीला अडथळा निर्माण होतो. स्टेशन रोडवरील नगरपालिका चौक ते नेहरू पुतळा आणि तेथून थेट बसस्थानकार्पयत दोन्ही बाजूंच्या दुकानांमधील सामान बाहेर ठेवले जातात. याशिवाय दुकानांचे फलक देखील बाहेर लावलेले असतात. अशा दुकानदारांवर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.