दुभाजकाला धडक देत टपरीवर ट्राला आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:03 PM2020-07-03T13:03:21+5:302020-07-03T13:03:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुभाजकाला धडक देत नाश्ता विक्रीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुभाजकाला धडक देत नाश्ता विक्रीच्या टपरीवर हातगाडीवर ट्राला उलटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वापीहून उत्तर प्रदेशकडे रीलचे बंडल घेऊन जाणारी ट्रक (क्रमांक यु.पी.७५ एम-६६९४) शहादा-खेतिया रस्त्यावरील रायखेड गावात असलेल्या दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्ता विक्रीच्या टपरीवर जाऊन आदळला. त्यात टपरीचे नुकसान झाले असून उभा असलेल्या पादचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात ट्रालाचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी धाव घेत एकच गर्दी केली होती.
गेल्या दोन वर्षापासून कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात काही भागातील रस्ता पूर्ण झाला असून गावागावात रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. परंतु या दुभाजकाला रिफ्लेकटर नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाला दुभाजक दिसून येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. गेल्या महिन्यात खेडदिगर येथे दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाला होता. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु वारंवार होणाºया घटनांमुळे जर कधी दुर्दैवाने जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.