नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर; भाजपच्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित अध्यक्षपदी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 04:55 PM2022-10-17T16:55:25+5:302022-10-17T16:57:32+5:30
नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, त्यात काँग्रेसचे २४, भाजप २०, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादीचे चार असे सदस्य आहेत.
- रमाकांत पाटील
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेत अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदी भाजपच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक हे विजयी झाले. विद्यमान अध्यक्षा ॲड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांचा सहा मतांनी पराभव झाला.
नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, त्यात काँग्रेसचे २४, भाजप २०, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादीचे चार असे सदस्य आहेत. सुरूवातीच्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्याने सत्ता काँग्रेसकडे होती. आता अडीच वर्षानंतर कालावधी संपल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. त्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनाचे दोन तथा काँग्रेसचे चार सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित ह्या अध्यक्षपदी विजयी झाल्या तर सुहास नाईक हे उपाध्यक्षपदी विजयी झाले.
त्यांना प्रत्येकी ३१ मते मिळाली तर पराभूत सीमा वळवी व राम रघुवंशी यांना २५ मते मिळाली. काँग्रेस व शिवसेनेने पक्षाचा व्हीप जाहीर करूनही सदस्य फुटल्याने आता या सदस्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित ह्या राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या तर खासदार डॉ.हीना गावित यांच्या भगिनी आहेत.