जनावरांच्या हाडांची वाहतूक, दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:47 PM2018-12-09T12:47:44+5:302018-12-09T12:47:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : जनावरांच्या हाडांची वाहतुक करणारा ट्रक नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ट्रक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : जनावरांच्या हाडांची वाहतुक करणारा ट्रक नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ट्रक चालक व वाहक फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे जमावाने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला.
शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार येथुन गुजरात कडे जात असलेल्या ट्रकमधून (क्रमांक एमएच 15 बीजे 104) घाण वास येत होता. गुजरात हद्दीवर बेडकी येथे विशाल सुधीर रघुवंशी रा. नंदुरबार यांनी ट्रक उभा केला असता चालक रोशन महेबूब कुरेशी रा. नंदुरबार व सहचालक ट्रक सोडुन पसार झाले. आरोग्यास अपायकारक होइल असे माहित असतांना आरोपीतांनी जनावरांच्या हाडांचे सांगाडे घेऊन त्याची वाहतूक केल्याची तक्रार विशाल रघुवंशी यांनी नवापूर पोलीसात दिली. त्यावरून रोशन कुरेशी व अज्ञात सहचालक यांचे विरोधात नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नवापूर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अफवा पसरल्याने अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईची तत्परतता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. सायंकाळी जप्त केलेल्या ट्रकमधील हाडांच्या सांगाडय़ांची विल्हेवाट लावण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व पथकाकडून सुरू होते.
दरम्यान, नंदुरबारातून हा ट्रक रवाना झाला होता. त्यामुळे अधीक तपास नंदुरबारातही होत आहे.