चिनोद्यात आढळलेल्या बिबट्यांना शोधण्यासाठी लागले ट्रॅप कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:10 PM2020-11-25T12:10:17+5:302020-11-25T12:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात जाताना अचानक तीन बिबट समाेर आल्याने सात जणांची धावपळ उडाल्याची सोमवारी रात्री घडली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात जाताना अचानक तीन बिबट समाेर आल्याने सात जणांची धावपळ उडाल्याची सोमवारी रात्री घडली होती. घटनेनंतर प्रसंगावधान सर्व सात जण झाडावर चढल्याने बचावले आहेत. दरम्यान झाडावरूनच पोलीस व तळोद्याचे नगराध्यक्ष यांना संपर्क करुन मदत मागितली होती. मदत आल्यानंतर झाडावरून खाली आलेल्या सर्वच जण अक्षरश: ढसाढसा रडून अश्रूंना वाट मोकळी करुन देत होते.
तळोदा शहरातील माजी नगरसेवक रुपसिंग बिरबा पाडवी हे तळोदा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिनोदा शिवारातील एका शेतात धडगाव तालुक्यातून आलेल्या नातेवाईकांना जात होते. सायंकाळी साडेसात वाजता ते शेतात पाेहोचले असतानाच त्यांच्यासमोर नर व मादी बिबट्यासह बछडा येवून हजर झाला. अवघ्या दहा फूटांच्या अंतरावर आलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा वेळ नसल्याने त्यांनी शेतात राहणारे सहा-सात जणांना झाडावरील मचाणावर जाण्याची सूचना करत स्वत:ही झाडावर चढले. बराच वेळ होवूनही झाडाच्या जवळपास फिरणारे बिबट्याचे कुटूंब जात नसल्याने अखेर रूपसिंग पाडवी यांनी तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी यांना झाडावरूनच संपर्क करुन माहिती दिली होती. नगराध्यक्ष परदेशी यांनी तातडीने तळोदा पोलीस ठाणे व वनविभाग यांना संपर्क करत स्वत: घटनास्थळ गाठले. याठिकाणी पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक नंदराज पाटील व पथक तसेच वन अधिकारी व कर्मचा-यांनी फटाके फोडून बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान नगराध्यक्ष परदेशी व त्यांचे कार्यकर्ते आणि चिनोदा ग्रामस्थही हजर झाल्याने बिबट्या पसार झाला.
यानंतर मचाणावर बसलेल्या रूपसिंग पाडवी, वनसिंग पाडवी, सुमनबाई पाडवी, जत्रीबाई पाडवी, ललित पाडवी व प्रियंका पाडवी या सर्व सात जणांना खाली उतरवण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रुपसिंग पाडवी हे नगराध्यक्ष अजय परदेशी यांना मिठी मारून ढसाढसा रडत होते.
दरम्यान तळोदा तालुक्यात बिबट्याच्या संचाराच्या घटना पुन्हा समोर येवू लागल्याने चिंता वाढल्या आहेत. हिवाळ्यात ऊसाच्या शेतीत मुक्कामाला जागा मिळत असल्याने सातपुड्याच्या डोंगराळ भागातील बिबटे शेतशिवारात येतात. यातून शेतमजूर व शेतक-यांच्या हल्ल्यांच्या घटनाही घडून येतात. यंदा पुन्हा तेच प्रकार सुरू झाले असल्याने वनविभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देत यंदा बिबट्यांना हुसकावून लावण्यासाठी विशेष मोहिम राबवली जावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
ठसे मिळाले
- दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकही येथे दाखल होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी तिघा बिबट्यांचा शोध घेतला होता. परंतू ते मिळून आलेले नाही. याठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले आहेत.
- मंगळवारी सकाळी वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी या भागात सहा वन कर्मचारी नियुक्त करत माहिती घेण्याचे सूचित केले होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच नर-मादी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची परवानगी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून मागितली गेली आहे. याला अद्याप मंजूरी नसली तरी येत्या दोन दिवसात मंजूरी आल्यानंतर पिंजरे लावले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वनविभागाने चिनोदा गावात जावूनही मार्गदर्शन केले.