पिंपळखुट्यात आदिवासी अधिकार वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:20+5:302021-09-21T04:33:20+5:30
नंदुरबार : आदिवासी बांधवांना युनोने दिलेला अधिकार व हक्कांची जाणीव व्हावी म्हणून पिंपळखुटा, ता. अक्कलकुवा येथे आदिवासी अधिकार दिन ...
नंदुरबार : आदिवासी बांधवांना युनोने दिलेला अधिकार व हक्कांची जाणीव व्हावी म्हणून पिंपळखुटा, ता. अक्कलकुवा येथे आदिवासी अधिकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कोरोना नियमांचे पालन करीत अधिकार रॅली, वृक्षारोपण व व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला.
मुळातच हक्कांप्रति आदिवासींमध्ये एकता निर्माण करीत चेतना जागविणाऱ्या एकता परिषदेने नेहमीच ‘निसर्ग वाचवा; भविष्य घडवा’ असा संदेशही दिला आहे. यामागे परिषदेचा व्यापक उद्देश आहे, त्यात अनेक गंंभीर स्वरूपाच्या आजारांंवर मात करण्याची क्षमता आदिवासी खाद्यसंस्कृतीत सामावली असून, ही खाद्यसंस्कृती टिकवण्यासाठी निसर्ग तथा प्रकृती टिकणे अत्यावश्यक आहे. शिवाय पर्यावरणपूरक जीवनपद्धती केवळ आदिवासींमध्येच दिसून येतेे. ही संस्कृती अधिक बळकट करण्याचा उद्देश प्रामुख्याने एकता परिषदेने ठेवला आहे. युनोतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदिवासी अधिकार दिनानिमित्त वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एकता परिषदेचे डॉ. दिलवरसिंग वसावे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते सी. के. पाडवी, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, एकता परिषदेचे जिल्हा सचिव ॲड.अभिजित वसावेे, करमसिंग पाडवी, पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, ॲड. सरदार वसावे आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी इतिहासकार तथा मोडवी जात्र्या महाराज यांनी देव हिराजा व बाबा काटाला यांच्या कथावाणीतून केले. दरम्यान, वाहरू सोनवणे यांनी आदिवासी अधिकाराची प्रत्येक आदिवासी बांधवांकडून अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.दिलवरसिंग वसावे यांनी गावपातळीवर उपक्रम राबवत आदिवासींना अधिकाराची जाणीव करून दिल्यास युनोचे निर्णय सत्कारणी लागेल, असे मत व्यक्त केले. सी. के. पाडवी व प्रताप वसावे यांनी संस्कृतीवर तर निर्मला राऊत यांनी आदिवासी महिला अधिकारावर मार्गदर्शन केले.
सामूहिक श्रमदानाला प्रोत्साहन
कुठलाही मोबदला न घेता केवळ एक वेळचे भोजन करीत एकाच दिवसात एका शेतकऱ्याच्या शेतात पूर्ण निंदणी, एखाद्या कुटुंबासाठी पूर्ण घर बांधणी व अन्य कामे सामूहिकरीत्या करण्याची प्रथा आदिवासींमध्ये आहे. या पद्धतीला गुजरात व महाराष्ट्राच्या भागात होमण तर धडगाव एम. पी. भागात लाहया म्हणतात. ही परंपरा बळकट व प्रोत्साहित करण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत यांच्यासह सेवी राऊत, मोगी राऊत, तारकी वसावे यांनी प्रेरणा गीत सादर केले.
वनभाज्या देणाऱ्या झाडांची लागवड
आदिवासींच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वनभाज्यांची नितांत आवश्यकता आहे. ही गरज ओळखून या कार्यक्रमानिमित्त पिंपळखुटा येथे वनभाज्यांचे उत्पन्न देणाऱ्या झाडांचीच लागवड करण्यात आली. त्यात शेवगा, भोकर व अन्य औषधी झाडांचा समावेश आहे.