शाळांमध्ये चोरी करणारे त्रिकुट अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १८ ठिकाणी चोरी केल्याचे कबूल, एलसीबीने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:18+5:302021-09-24T04:36:18+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शिक्षकांनी मेहनतीने तयार केेलेल्या डिजिटल क्लासरूमचे साहित्य ...
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शिक्षकांनी मेहनतीने तयार केेलेल्या डिजिटल क्लासरूमचे साहित्य चोरीस जात असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी वाढू लागली होती. नूतन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी याबाबत लागलीच एलसीबीला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाला गती दिली. याच दरम्यान चिरडे, ता. शहादा येथे एकजण कमी किमतीत व विना बिल पावती इन्व्हर्टर व बॅटरी विकण्यास येत असल्याची माहिती कळकमर यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक गावात पाठविले. पथकाने वेषांतर करून गावात पाळत ठेवली असता एकास बॅटरी, इन्व्हर्टरसह ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव सोमनाथ ऊर्फ सोमा काशीनाथ दशरथ, रा.सुलवाडे, ता.शहादा असे सांगितले. त्याला पुन्हा विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने अजय आंबालाल मोरे (२१) रा.सुलवाडे, ता.शहादा व अजय ऊर्फ टाईगर राजू पावरा (२२) रा.ब्राम्हणपुरी, ता.शहादा यांची नावे सांगितली. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.
पथकाने विविध कंपनीचे नऊ इन्व्हर्टर, नऊ बॅटरी, दोन एलईडी टीव्ही, दोन होमथिएटर, एक एलसीडी मॉनिटर, एक फॅन व दुचाकी असा तीन लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमाल लवकरच जप्त करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस कर्मचारी गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतीष घुले यांच्या पथकाने केली.
चोरी उघडकीस आलेल्या शाळा
सर्व घटना या शहादा तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये जवखेडा, पिंप्री, गोगापूर, होळमोहिदा, तिखोरा, परिवर्धा, सावखेडा, गोदीपूर, भादे, पाडळदा, डामरखेडा, काथर्दा. शेतकी विद्यालय कळंबू या शाळांमधील चोरींसह ग्रामपंचायत कार्यालय सावखेडा, ता. शहादा, तिखोरा येथील मंदिरातील चोरी, ब्राह्मणपुरी येथील तेलाच्या टाक्या, टवळाई येथील ॲल्युमिनियम तार, रायखेड येथील टायर चोरीचे गुन्हे देखील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कबूल केेले आहेत.