अक्कलकुव्यात मोकाट गुरांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:03+5:302021-07-16T04:22:03+5:30
महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची चाळण नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान नळगव्हाण फाटा ते गुजरात हद्दीतील डोडवापर्यंतचा रस्त्याची चाळण झाली ...
महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची चाळण
नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान नळगव्हाण फाटा ते गुजरात हद्दीतील डोडवापर्यंतचा रस्त्याची चाळण झाली आहे. गुजरात राज्यातून नंदुरबारकडे जाणारे व येणारे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. गुजरात हद्दीपर्यंत एक किलोमीटर अंतरात मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मासेमारीसाठी बॅरेजमध्ये गर्दी
नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेजचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले आहेत. यामुळे बॅरेजच्या दुसऱ्या बाजूला पाणी साचल्याने त्यातून मासे पकडण्यासाठी गुरुवारी मच्छीमारांसह हाैशींची गर्दी उसळली होती. नंदुरबार ते प्रकाशा मार्गावरील पुलापर्यंत अनेकजण मासेमारी करीत असल्याचे दिसून आले.
गतिरोधकांची गरज
नंदुरबार : कोळदे गावापासून कोरीटपर्यंतचा रस्ता विस्तारीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या ठिकाणी आता सुरक्षा उपायांची गरज आहे. रस्त्यालगतच्या गावांमध्ये गतिरोधकांची मागणी आहे.
विजेचा लपंडाव
नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली, पातोंडा व वाघोदा शिवारांत बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा नसल्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असून योग्य कारवाईची मागणी आहे.
अवैध पार्किंग
अक्कलकुवा : शहरातील बसस्थानक ते मोलगी चाैफुलीदरम्यान महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने लावली जात आहेत. यातून मार्गावर होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होत असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
लसींचा पुरवठा करा
अक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागासह शहरातील लसीकरण केंद्रांवर नियमित लसींचा पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. बऱ्याच ठिकाणी लसींचा पुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारी केंद्र बंद पडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.