ट्रकने विजेची तार तोडल्याने घोडजामणे रस्त्यावर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:49 PM2021-01-03T12:49:36+5:302021-01-03T12:49:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील घोडजामणे गावानजीक उसाने भरलेल्या ट्रकने वीजतार तोडल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर वीजतार रस्त्यावर लटकली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील घोडजामणे गावानजीक उसाने भरलेल्या ट्रकने वीजतार तोडल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर वीजतार रस्त्यावर लटकली होती. वीजपुरवठा सुरू असतानाही श्रीरामपूर-सुरत बस व मालेगाव-सुरत या बसचालकांनी धोकादायक पद्धतीने बस मार्गस्थ केली. वीजतार तुटल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्यावर वीजतार तुटल्याची माहिती सरपंच राजकुमार गावित यांनी नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोनद्वारे दिली व तत्काळ वीजपुरवठा बंद करण्याचे सांगितले. तोपर्यंत ग्रामस्थांनी डीपीचा फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. या घटनेने शेतात काम करणारे शेतकरी व महिला थोडक्यात बचावल्या. हा वीजपुरवठा नवापूर तालुक्यातील घोडजामणे ग्रामपंचायतअंतर्गत तीन फेजलाइन शेतीसाठी वापरली जाते. नवापूर तालुक्यातील मोरथुवाहून ऊस भरून ट्रक (एम.एच.झेड. २१४८) नाशिक जिल्ह्यात जात असताना उसाच्या फटक्याने वीजतार तुटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही वेळातच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यादरम्यान, नवापूर शहरात शनिवारी आठवडे बाजार भरतो. बाजार करून प्रवासी वाहतूक करणारे चालक ग्रामीण भागातील ग्रामस्थांना वाहनाच्या टपावर बसवून धोकेदायक पद्धतीने मार्गस्थ होत होते. ग्रामस्थांनी विरोध केला तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विजापूर येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा बंद करून लाकूड व बांबूने तारवर करून वाहनचालकांना मदत केली. काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.