शहाद्यात डिव्हायडरवर ट्रक आदळून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:17 PM2020-12-28T12:17:02+5:302020-12-28T12:17:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने चालकास समोरचे न दिसल्याने कांद्याने भरलेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने चालकास समोरचे न दिसल्याने कांद्याने भरलेला ट्रक दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. शहराबाहेरील प्रकाशा रस्त्यावर वीज केंद्राजवळ रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दुभाजकावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे महिनाभरात हा सहावा अपघात झाला.
कोळदा ते खेतिया रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. हा मार्ग शहादा शहरातून जात असल्याने वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे महुआ येथून कांद्याने भरलेला ट्रक (क्र. जीजे ७ टीटी ८९५७) चंद्रपूरकडे जात असताना शहरानजीक १३२ केव्ही वीज उपकेंद्राजवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटमुळे चालकाच्या नजरेस दुभाजक दिसले नाही. त्यामुळे कांद्यांनी भरलेला ट्रक त्यावर धडकून उलटला. सुदैवाने चालक व सहचालकास दुखापत झाली नाही. मात्र ट्रकचे व कांद्याचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, शहराच्या हद्दीत असलेल्या दुभाजकावर रेडियम लावणे गरजेचे आहे. या रस्त्याचे काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले तर काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी होत आहेत. शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो. धुळीच्या त्रासाबरोबर रात्रीच्यावेळी डिव्हायडर दिसावेत यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. या रस्त्यावर महिनाभरात सहाव्यांदा अपघात झाला आहे. संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी या दुभाजकांवर रेडियम लावून अपघात होणार नाही यासाठी संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.